CSK vs GT, IPL 2022 : ऋतुराज गायकवाडचे अर्धशतक आणि नारायण जगदीशन याच्या छोटेखानी खेळीच्या जोरावर चेन्नईने निर्धारित 20 षटकात पाच गड्यांच्या मोबदल्यात 133 धावा केल्या. गुजरातच्या गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच भेदक मारा केला. चेन्नईच्या फलंदाजांना एका एका धावेसाठी संघर्ष करावा लागला. गुजरातला विजयासाठी 134 धावांचे आव्हान देण्यात आलेय. 


चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम फंलदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण गुजरातच्या गोलंदाजांनी टिच्चून मारा केला. मोहम्मद शामीने भन्नाट फॉर्ममध्ये असणाऱ्या कॉन्वेला साहाकरवी झेलबाद केले. कॉन्वे 5 धावा काढून माघारी परतला. कॉन्वे बाद झाल्यानंतर ऋतुराज गायकवाड आणि मोईन अली यांनी चेन्नईचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण साई किशोर याने मोईन अलीला बाद करत गुजरातला दुसरे यश मिळवून दिले. मोईन अलीने 21 धावांची खेळी केली. मोईन बाद झाल्यानंतर ऋतुराज गायकवाड याने सामन्याची सर्व सुत्रे आपल्याकडे घेतली. ऋतुराज गायकवाड याने संयमी फंलदाजी करत अर्धशतक झळकावले. गायकवाडने 49 चेंडूत 53 धावांची खेळी केली. राशिद खान याने गायकवाडचा अडथळा दूर केला. ऋतुराज गायकवाड बाद झाल्यानंतर शिवम दुबेही माघारी परतला..दुबेला एकही धाव काढता आली नाही. अखेरच्या काही षटकांमध्ये धोनीला करिश्मा करता आला नाही. धोनी 10 चेंडूत सात धावा काढून माघारी परतला. 


गायकवाड-जगदीशन यांची संयमी फलंदाजी -
रॉबिन उथप्पाच्या जागी संघात स्थान मिळालेल्या एन जगदीशन याने संयमी फलंदाजी केली. जगदीशन याने 33 चेंडूत नाबाद 39 धावांची खेळी केली. ऋतुराज गायकवाड यानेही संयमी फलंदाजी करत अर्धशतक झळकावले. खेळपट्टी गोलंदाजीसाठी पोषक असल्याचे समजताच दोन्ही फलंदाजांनी संयमी खेळी केली. दोघांच्या खेळीच्या बळावर चेन्नईने 133 धावांपर्यंत मजल मारली. 


गुजरातचा भेदक मारा - 
वानखेडेच्या खेळपट्टीवर गुजरातच्या गोलंदाजांनी अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली. मोहम्मद शामीने चार षटाकत फक्त 19 धावा खर्च करत महत्वाच्या दोन विकेट घेतल्या.  राशिद खान, अल्झारी जोसेफ, आर साई किशोर यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली. कर्णधार हार्दिक पांड्याने दोन षटके गोलंदाजी केली. हार्दिक पांड्याला एकही विकेट मिळाली नाही. पण दोन षटकात फक्त आठ धावा खर्च केल्या.