CSK Captain MS Dhoni : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि 'कॅप्टन कूल' महेंद्र सिंह धोनीनं (Mahendra Singh Dhoni) पुन्हा एकदा चेन्नई सुपर किंग्ज संघाच्या कर्णधार पदाची धुरा पुन्हा एकदा सांभाळली आहे. रविवारी खेळवण्यात आलेल्या आयपीएलच्या सामन्यात धोनीनं चेन्नई सुपर किंग्सचं (Chennai Super Kings) कर्णधार पद स्विकारलं. धोनीनं जबाबदारी सांभाळताच, चेन्नई सुपर किंग्सनं यंदाच्या आयपीएलमध्ये आपलं खातं उघडलं. सनरायझर्स हैदराबादवर मात करत चेन्नईनं सामना खिशात घातला.
महेंद्र सिंह धोनीनं बऱ्याच काळापासून चेन्नईकडून खेळतोय. रविवारी सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात टॉस दरम्यान, त्यानं चेन्नईसोबत आणखी किती काळ राहणार? याबाबत संकेत दिले. धोनीनं पुढेही तो चेन्नईसोबतच राहणार असल्याचं म्हटलं आहे. ज्यावेळी धोनी टॉससाठी मैदानावर पोहोचला, त्यावेळी कमेंटेटर डॅनी मॉरिसनने त्याला प्रश्न विचारला की, "जो प्रश्न मी दोन वर्षांपूर्वी विचारला होता, तो आज मी पुन्हा विचारणार आहे. पुढच्या वर्षीही आम्ही तुला चेन्नईच्याच जर्सीमध्ये पाहू शकू?"
डॅनी मॉरिसननं विचारलेल्या प्रश्नावर बोलताना धोनी म्हणाला की, "मी गेल्यावेळीही सांगितलं होतं की, तुम्ही मला चेन्नईच्याच जर्सीत पाहाल. पण कोणत्या, हे जाणून घेण्यासाठी मात्र तुम्हाला काही काळ वाट पाहावी लागेल." दरम्यान, सीएसकेचा संघ आयपीएलच्या पहिल्या सीझनपासूनच धोनीवर अवलंबून आहे. या सीझनच्या सुरुवातीलाच धोनीनं कर्णधार पद सोडलं होतं. आणि चेन्नईची धुरा ऑलराउंडर रविंद्र जाडेजाच्या खांद्यावर सोपावली होती. परंतु, जाडेजाच्या नेतृत्त्वात संघ फारशी कमाल दाखवू शकला नाही. चेन्नईनं आतापर्यंत एकूण 8 सामन्यांपैकी केवळ 2 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. संघाच्या निराशाजनक कामगिरीनंतर जाडेजानं कर्णधार पदाचा राजीनामा देत. पुन्हा सीएसकेची कमान धोनीच्या खांद्यावर सोपवली.
धोनीच्या नेतृत्त्वात चेन्नईचा दुसरा विजय
पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर सुरु असलेल्या आयपीएलच्या 46 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जनं सनरायजर्स हैदराबादला 13 धावांनी पराभूत केलं. या सामन्यात टॉस जिंकून दिल्लीच्या संघानं चेन्नईला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलं. त्यानंतर चेन्नईच्या संघानं 20 षटकात 2 विकेट्स गमावून 202 धावा केल्या. प्रत्युत्तरात हैदराबादच्या संघाला 20 षटकात 6 विकेट्स गमावून धावा 189 करता आल्या.