Arshdeep Singh: आयपीएलमध्ये शनिवारी रात्री (22 एप्रिल) झालेल्या सामन्यात पंजाबच्या अर्शदीप सिंगने शेवटच्या षटकात दोन विकेट घेत मुंबईच्या (PBKS vs MI) तोंडचा घास काढून घेतला. अर्शदीपच्या दोन सलग याॅर्करवर दोन स्टम्पचे तुकडे पडले. त्यामुळे अर्शदीप सिंग मुंबईसाठी कर्दनकाळ ठरलाच, पण आयपीएलला सुद्धा मोठा आर्थिक फटका बसला आहे. एलईडी असलेल्या स्टम्प अत्यंत महागड्या आहेत. काही खेळाडूंचा तेवढा पगार सुद्धा नाही, एवढ्या त्या महाग आहेत.
आयपीएलमध्ये एलईडी स्टम्प वापरले जातात. या एलईडी स्टम्पच्या एका सेटची किंमत 25 ते 35 लाखांच्या दरम्यान आहे. त्याची किंमत वेगवेगळ्या देशांमध्ये बदलते. अशा स्थितीत अर्शदीपने दोन चेंडूंवर बॅक टू बॅक तुकडे केल्याने आयपीएलला किमान 50 ते 70 लाखांचे नुकसान झाले आहे. सामन्याच्या शेवटच्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर अर्शदीपने तिलक वर्माची पहिल्यांदा स्टम्प गुल केली. त्यानंतर चौथ्या चेंडूवर नेहल वढेराचा त्याच मार्गाने पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. या बॅक टू बॅक विकेट्सने पंजाबने मुंबईच्या (PBKS vs MI) तोंडचा हिरावला. या सामन्यात पंजाबने मुंबईचा 13 धावांनी पराभव केला.
अनेक आयपीएल खेळाडूंच्या पगारापेक्षा स्टम्प महाग
खेळपट्टीच्या दोन्ही बाजूंना दोन LED स्टम्प सेट जोडल्यास त्यांची किंमत 50 ते 70 लाखांच्या दरम्यान आहे. आयपीएलमध्ये असे अनेक खेळाडू आहेत ज्यांचे आयपीएल पगार 50 लाखांपेक्षा कमी आहे. यात अजिंक्य रहाणेसारख्या दिग्गजांचाही समावेश आहे. अशा स्थितीत स्टम्पची किंमत एखाद्या खेळाडूच्या वर्षभराच्या आयपीएल पगारापेक्षा जास्त आहे.
एलईडी स्टम्प इतके महाग का आहेत?
या स्टम्पमध्ये एलईडी लाईट्स आहेत. क्लोज रन आऊट आणि स्टम्पिंगमध्ये ते थर्ड अंपायरला खूप मदत करते. चेंडू किंवा हात या स्टम्पला स्पर्श करताच, त्यांचे एलईडी चमकू लागतात, ज्यामुळे तिसऱ्या पंचांना निर्णय घेणे सोपे होते. यासोबतच या स्टम्पमध्ये माईकही आहे, ज्यामुळे चेंडू आणि बॅटमधील संपर्क कळतो. या स्टम्पला कॅमेरेही जोडलेले आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या