मुंबई : आयपीएल… इंडियन प्रिमियर लीग… जिथं क्रिकेट फक्त खेळ नाही, तर धर्म आहे. अशा ठिकाणी जन्म घेतलेली अनोखी स्पर्धा… गेल्या दशकात आयपीएलनं आपल्याला अनेक गोष्टी दिल्या. आयपीएलच्या दहाव्या मोसमाची सांगता होत असताना गेल्या नऊ पर्वांचा घेतलेला धावता आढावा.


मनोरंजन आणि व्यवसायाच्या धर्तीवर सुरु झालेल्या आयपीएलनं पहिल्याच वर्षी तुफान प्रतिसाद मिळवला. कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवरचं मॅक्युलमचं शतक आजही आपल्या लक्षात आहे. त्याच सत्रात नवख्या समजल्या जाणाऱ्या राजस्थानच्या संघानं धोनीच्या सुपरकिंग्जला हरवून पहिलं आयपीएल जिंकलं होतं.

पहिल्या सत्राचं यश पाहून आयोजकांनी आयपीएल भरवलं तेही सातासमुद्रापलिकडे... थेट दक्षिण आफ्रिकेत... या सत्रात बंगळुरुच्या रॉयल चॅलजेंर्सनं आयपीएलची फायनल गाठली. पण सध्याचा मुंबईचा कॅप्टन रोहित शर्मा, आणि कांगारुंच्या ताफ्यातील गिलख्रिस्ट आणि सायमंडच्या जोरावर डेक्कन चार्जर्स हैदराबादनं दुसऱ्या आयपीएलवर नाव कोरलं.

2010 च्या आयपीएल सत्रात क्रिकेटच्या देवानं म्हणजेच सचिननं दमदार कामगिरी करत संघाला फायनला नेलं. पण तीन वर्षात दुसऱ्यांदा फायनल गाठणाऱ्या धोनीच्या सुपरकिंग्जनं बाजी मारली. मुंबईच्या डी.वाय पाटील स्टेडियमवर मुंबईला हरवत चेन्नई सुपर किंग्जनं पहिल्यांदा आयपीएल जिंकलं.

2011 मध्ये परत एकदा धोनीच्या नेतृत्वात दुसऱ्यांदा आयपीएलच्या ट्रॉफीवर नाव कोरलं. 2012 मध्ये शाहरुख खानच्या कोलकाता नाईट रायडर्सनं पहिल्यांदा आयपीएल जिंकलं. 2013 ला एकदा फायनलमध्ये हरणाऱ्या मुंबईनं बाजी मारली.

2014 मध्ये पुन्हा एकदा गंभीरच्या नेतृत्वात कोलकात्यानं आयपीएलच्या ट्रॉफीवर नाव कोरलं. 2015 ला चेन्नईला हरवून रोहितच्या मुंबई इंडियन्सनं दुसऱ्यांना आयपीएल जिंकलं. गेल्या वर्षी म्हणजे 2016 मध्ये डेव्हिड वॉर्नरच्या सनरायजर्सनं आपल्या पहिल्याच मोसमात विजयी सलामी दिली.

जगातले  सर्वात बेस्ट ओपनर्स आपला सचिन आणि श्रीलंकेचा जयसुर्या सोबत बॅटिंग करताना आपल्याला आयपीएलनं दाखवले.

2011 च्या आयपीएल सत्रात सर्वात जास्त म्हणजे 10, तर पुढच्या दोन वर्षात म्हणजे 2012 आणि 2013 मध्ये 9 संघांचा समावेश होता. क्रिकेटपटूंचं शेड्युल बिझी होत असल्यामुळे आयपीएलवर नेहमीच टीका झाली. खेळाडूंच्या कामगिरीवरही अनेकवेळा त्याचा परिणाम पाहायला मिळाला.

अनेक चढ उतार पाहणाऱ्या आयपीएललादेखील फिक्सिंगची वाळवी लागली. ती वाळवी या सत्रातदेखील लागल्याचं पाहायला मिळालं. गुजरात लायन्स या नव्या संघातील काही खेळाडूंचा फिक्सिंगमध्ये समावेश
असल्याचा आरोप होत आहे.

गेल्या दहा वर्षात आयपीएलनं भारतासह अनेक देशांना नवे खेळाडू दिले. जागतिक पातळीवर ते आज आपली छाप सोडत आहेत. सध्याच्या टीम कोहलीमध्ये तर जवळपास अर्धे खेळाडू हे आयपीएलचं फलित म्हणता येईल.

बाहुबलीच्या काळातही आयपीएलनं आपला क्राऊड तितक्याच प्रमाणात कायम राखल्याचं पाहायला मिळालं. सगळ्या गोष्टींच्या शेवटी आयपीएलची प्रसिद्धी तसुभरही कमी झाली नाही.

आयपीएलच्या दहाव्या सत्राच्या शेवटच्या टप्प्यावर आलो आहोत. कांगांरुंचा कॅप्टन स्मिथ आणि धोनीच्या पुणे सुपरजायंट संघानं चमकदार कामगिरी करत पहिल्यांदाचं फायनल गाठली आहे. तर दुसरीकडे आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीनं सगळ्यानाचं प्रभावित करणारी मुंबई तिसऱ्यांदा आयपीएल जिंकण्यापासून एक मॅच दूर आहे.

कमाल अशी की गुणतालिकेत नंबर एकवर राहणाऱ्या मुंबईनं या सत्रात पुण्याकडून तीन वेळा पराभव पत्करला आहे. त्यामुळे अंतिम सामन्यात काय होणार, याची उत्सुकता तमाम आयपीएल रसिकांना लागली आहे. आयपीएलचं सत्र कोणातही संघ जिंको, ट्रॉफी मात्र महाराष्ट्रातच राहणार.