पुणे : यमराजांचं राक्षसी हास्य चक्क पुण्यातल्या रस्त्यावर बघायला मिळत आहे. शनिवारी सकाळी सकाळी यमराज पुण्यात अवतरले आणि सिग्नल तोडणाऱ्या एकेकाच्या गचांडीला धरुन त्यांनी चांगलाच धडा शिकवला.
यमराज प्रकट झाले म्हटल्यावर त्यांना बघायला सोज्वळ पुणेकरांची गर्दी जमली. कुणी सेल्फी काढत होतं, तर कुणी आपल्यावर यमराजाचा हात पडू नये म्हणून धूम ठोकून पळत होतं. खरं म्हणजे ही आयडिया होती पुण्यातल्या वाहतूक पोलिसांची.
पुणेकरांनी किमान वाहतुकीचे नियम पाळावेत, इतकीच यमराजांची अपेक्षा. सिग्नल न तोडणे, वेगावर नियंत्रण राखणं, हेल्मेट घालणं असे नियम पाळल्यास अपघात टळतील. यमराजाच्या दर्शनाने पुणेकरांच्या गाड्यांचा स्पीड कमी होईल अशी भाबडी आशा वाहतुक पोलिसांना आहे.
आपल्या बोलण्याने कायम दुसऱ्यांना यम दर्शन घडवणाऱ्या पुणेकरांना हा यम जाम आवडला. सुसाट गाड्या दामटवताना कधी अचानक खऱ्याखुऱ्या यमराजाची भेट घडेल हे सांगता येत नाही. मात्र सध्या तरी हा यमराज भरधाव पुणेकरांचा रेड सिग्नल ठरत आहे.