पुणे : महेंद्रसिंग धोनीनं सिद्धार्थ कौलच्या अखेरच्या चेंडूवर चौकार ठोकून पुण्याला आयपीएलच्या सामन्यात हैदराबादवर एक रोमांचक विजय मिळवून दिला. धोनीच्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर रायझिंग पुणे सुपरजायंटनं बलाढ्य सनरायझर्स हैदराबादला सहा विकेट्स राखून हरवलं.


या विजयानं धोनीची मॅचफिनिशर म्हणून क्षमता अजूनही कायम आहे यावर शिक्कामोर्तब झालं. गहुंजेच्या एमसीए स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात हैदराबादनं पुण्याला विजयासाठी 177 धावांचं आव्हान दिलं होतं. हैदराबादवरील सनसनाटी विजयामुळे पुण्याला आयपीएलच्या गुणतालिकेत 'टॉप फोर'मध्ये स्थानही मिळवून दिलं.

राहुल त्रिपाठीनं 59 आणि स्टीव्ह स्मिथनं 27 धावांची खेळी रचून पुण्याचा डावाचा पाया रचला. धोनी मैदानात उतरला त्या वेळी, पुण्याला 61 चेंडूंत 90 धावांची आवश्यकता होती. त्यानं 34 चेंडूंत पाच चौकार आणि तीन षटकारांसह नाबाद 61 धावा फटकावून पुण्याच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

त्याआधी मोझेस हेन्रिक्सच्या नाबाद 55, डेव्हिड वॉर्नरच्या 43, शिखर धवनच्या 30 आणि केन विल्यमसनच्या 21 धावांच्या खेळीच्या जोरावर हैदराबादनं वीस षटकांत तीन बाद 176 धावांची मजल मारली होती.