औरंगाबाद : लहानपणीच आई वडील गेल्याने अनेकांच्या डोक्यावरचं छत्र हरवतं आणि पोरकेपणा वाट्याला येतो. पण त्यांना आपलंसं केलं तर हक्काची माणसं मिळू शकतात. अशाच औरंगाबादमधील एका रत्नमालेची कहाणी सर्वांसाठी आदर्शवत आहे.


वऱ्हाडी आले, नवरा नवरी सजले आणि सुरु झाली लग्नाची लगबग. औरंगाबादच्या विद्यादीप बालगृहातली लगीनघाई होती रत्नमाला आणि पवनकुमारच्या लग्नाची.

रत्नमालाच्या आई वडिलांचा तिच्या लहानपणीच असाध्य आजाराने मृत्यू झाला. त्यामुळे तिला बालगृह जवळ करावं लागलं. पण पवनकुमारने मागणी घातली आणि रत्नमालाच्या आयुष्यातल्या एकटेपणाला पूर्णविराम मिळाला.

आता मुलीची पाठवणी करायची म्हणजे कन्यादान आलं. यावेळी बालकल्याण समितीचे अध्यक्षच रत्नमालाचे आई वडील झाले.
आजवरचं आयुष्य एकटेपणाच्या पोकळीत घालवल्यानंतर आता रत्नमालाला आयुष्याचा सोबती मिळाला आहे. त्यामुळे तिचाही आनंद आभाळात मावत नाही.

पवनकुमारच्या कुटुंबाने रत्नमालाला हक्काचं घर दिलं. जिव्हाळ्याची माणसं दिली. त्यामुळे हुंड्याच्या रकमेवर डोळा ठेवून लग्न करणाऱ्या तरुणांनी एकदा या सोहळ्याचा आदर्श डोळ्यापुढे ठेवायला हरकत नाही.