मुंबई : गतविजेत्या मुंबई इंडियन्सला आयपीएलच्या पहिल्या सामन्यातच पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. धोनीच्या रायझिंग पुणे सुपरजायंट्सने मुंबई इंडियन्सचा नऊ विकेट्सनी धुव्वा उडवून आयपीएलच्या पदार्पणात विजयी सलामी दिली.


 
वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात मुंबईने पुण्याला विजयासाठी 122 धावांचं आव्हान दिलं होतं. त्याचा पाठलाग करताना अजिंक्य रहाणेनं नाबाद अर्धशतक झळकावलं. रहाणेनं 42 चेंडूंत सात चौकार आणि तीन षटकारांसह नाबाद 66 धावांची खेळी केली, तर फॅफ ड्यू प्लेसीनं 34 आणि केविन पीटरसननं नाबाद 21 धावा केल्या.

 
रायझिंग पुणेच्या गोलंदाजांनी मुंबई इंडियन्सला 20 षटकांत आठ बाद 121 धावांवर रोखण्याचा पराक्रम गाजवला. हरभजन सिंग, अंबाती रायुडू आणि विनयकुमारचा अपवाद वगळता मुंबईच्या एकाही फलंदाजाला दुहेरी धावसंख्या रचता आली नाही.

 
हरभजननं 45, रायुडूनं 22 आणि विनयकुमारनं 12 धावांची खेळी केली. रायझिंग पुणेकडून ईशांत शर्मा आणि मिचेल मार्शनं प्रत्येकी दोन विकेट्स काढल्या.