कोल्हापूर : खाजगी रुग्णालयातील डॉक्टर आणि नातेवाईकांच्या हलगर्जीमुळे एका वृद्ध महिलेवर जिवंतपणीच सरणावर ठेवण्याची वेळ आली होती. मात्र अग्नी देण्यापूर्वीच ती महिला जिवंत असल्याचं समजल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.

 
अंगावर काटा आणणारी ही घटना कोल्हापूरच्या कुत्रिडे गावात घडली आहे. अपघातात गंभीर जखमी झालेल्या वनिता भास्कर यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात हलवण्यात आलं. मात्र मेंदूला गंभीर दुखापत झाल्यामुळे उपचार शक्य नसल्याचं डॉक्टरांनी वनिता यांच्या नातेवाईकांना सांगितलं.

 
वनिता यांना घरी नेत असताना त्यांच्या शरीराच्या हालचाली थांबल्या. त्यामुळे वनिता यांचा मृत्यू झाल्याचा समज त्यांच्या नातेवाईकांनी करुन घेतला.

 
वनिता यांच्या अंत्यसंस्काराची तयारी झाली. त्यांना स्मशानात सरणावरही ठेवण्यात आलं. मात्र अग्नी देण्यापूर्वी वनिता हालचाल करत असल्याचं निदर्शनास आलं. अखेर सरिता यांना सरणावरुन पुन्हा सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सरकारी डॉक्टरांनी शर्थीचे उपचार करुन वनिता यांचे प्राण वाचवले आहेत.