पुणे : विराट कोहलीच्या बंगळुरु संघाचं आयपीएलमधलं आव्हान अखेर साखळी सामन्यांतच संपुष्टात आलं. रथीमहारथींचा समावेश असलेल्या बंगळुरुला शनिवारच्या सामन्यात आणखी एका लाजिरवाण्या पराभवाला सामोरं जाण्याची वेळ आली. या
सामन्यात पुण्यानं बंगळुरुचा 61 धावांनी धुव्वा उडवला.

खरं तर पुण्यानं बंगळुरुला विजयासाठी 158 धावांचं माफक आव्हान दिलं होतं. पण बंगळुरुला 20 षटकांत 9 बाद 96 धावांचीच मजल मारता आली. बंगळुरुकडून कर्णधार विराट कोहलीनं एकाकी झुंज दिली. त्यानं 48 चेंडूंत 4 चौकार आणि एका षटकारासह 55
धावांची खेळी केली.

बंगळुरुच्या इतर फलंदाजांना दोन आकडी धावा करता आल्या नाहीत. पुण्याकडून इम्रान ताहिरनं 18 धावांत तीन, तर लॉकी फर्ग्युसननं सात धावांत दोन फलंदाजांना माघारी धाडलं.

त्याआधी राहुल त्रिपाठीच्या 37, स्टीव्हन स्मिथच्या 45 आणि मनोज तिवारीच्या नाबाद 44 धावांच्या खेळींच्या जोरावर पुण्यानं 20 षटकांत तीन बाद 157 धावांची मजल मारली होती.