पुणे : स्टीव्ह स्मिथनं कर्णधारास साजेशी खेळी करून आयपीएलच्या दुसऱ्या सामन्यात रायझिंग पुणे सुपरजायंट्सला मुंबई इंडियन्सवर सात विकेट्स राखून दणदणीत विजय मिळवून दिला.
गहुंजे स्टेडियमवरच्या या सामन्यात स्टीव्ह स्मिथनं 54 चेंडूंत सात चौकार आणि तीन षटकारांसह नाबाद 84 धावांची खेळी केली. त्यानं अजिंक्य रहाणेच्या साथीनं दुसऱ्या विकेटसाठी 58 धावांची, बेन स्टोक्सच्या साथीनं तिसऱ्या विकेटसाठी 50 धावांची आणि धोनीच्या साथीनं चौथ्या विकेटसाठी 44 धावांची अभेद्य भागीदारी रचली.
त्याआधी, हार्दिक पंड्यानं अवघ्या 15 चेंडूंत फटकावलेल्या नाबाद 35 धावांच्या खेळीच्या जोरावर मुंबई इंडियन्सनं रायझिंग पुणेला विजयासाठी 185 धावांचं आव्हान दिलं होतं.
रायझिंग पुणेनं एक चेंडू आणि सात विकेट्स राखून ते आव्हान पार केलं. पुण्याच्या या विजयात लेग स्पिनर इम्रान ताहिरनंही मोलाची भूमिका बजावली. त्यानं 28 धावांच मुंबईच्या तीन फलंदाजांना माघारी धाडलं. त्यानंतर अजिंक्य रहाणेनं 65 धावांची खेळी करून पुण्याच्या विजयाचा पाया रचला.