रिलायन्स जिओ 4G लॅपटॉप बनवणार?
एबीपी माझा वेब टीम | 06 Apr 2017 10:23 PM (IST)
नवी दिल्ली : रिलायन्स जिओ लवकरच 4G सपोर्टिव्ह लॅपटॉप लॉन्च करु शकते. या लॅपटॉपमध्ये 4G सिमसाठी खास जागा असेल. ‘Phone Radar’च्या वृत्तानुसार, जिओ सध्या लॅपटॉप लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. अॅपलच्या मॅकबुकसारखं डिझाईन जिओच्या लॅपटॉपचं असेल. जिओ लॅपटॉपचा स्क्रीन 13.3 इंचाचा संपूर्ण एचडी असेल. एचडी व्हिडीओ कॉलिंग कॅमेऱ्यासोबतच, चिकलेट कीबोर्ड आणि मॅग्निशयम एलॉय बॉडी दिली जाईल. लॅपटॉप थंड राहावा, यासाठी लॅपटॉपमध्ये कूलिंग फॅनही लावला जाईल. क्वार्ड कोअर इंटेल प्रिमियम प्रोसेसर आणि 4 जीबी रॅमसोबतच कनेक्टिव्हिटीमध्ये चांगले फीचर्स पाहायला मिळणार आहेत. 4g, LTE, ब्लूटूथ, यूएसबी पोर्टही दिले जाईल. तैवानमधील कंपनी फॅक्सकॉनशी रिलायन्स जिओने लॅपटॉपसंदर्भात चर्चाही सुरु केली असल्याचा दावा Phone Radar ने केला आहे. टेलिकॉम क्षेत्रात रिलायन्स जिओने आधीच प्रस्थापित कंपन्यांना दणका दिला आहे. त्यामुळे आगामी काळात जिओ लॅपटॉप आल्यास सध्याच्या लॅपटॉप कंपन्यांना नक्कीच मोठी स्पर्धा निर्माण होईल.