IPL 2021 : आयपीएलचा 14वा सीझन कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आयपीएल रद्द झाल्यामुळे नाराज झालेले चाहत्यांना आयपीएलचं आयोजन पुन्हा कधी, केव्हा आणि कुठे करण्यात येणार याबाबत उत्सुकताही आहे. अशातच आयपीएलच्या आयोजनाबाबत मोठी बातमी हाती आली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार आयपीएलच्या उरलेल्या सामन्यांचं आयोजन 15 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर या कालावधीत दुबई येथे करण्यात येणार आहे.
एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता आयपीएल सामने रद्द करण्यात आले होते. स्थगित झालेले सामने दुबई येथे घेण्यात येणार आहे. 15 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर या 25 दिवसांच्या कालावधीत 31 सामन्यांचे आयोजन करण्यात येणार आहे.
आयपीएलमधील खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्यानंतर IPL रद्द
दरम्यान, आयपीएलच्या 14व्या सीझनमध्ये आतापर्यंत 29 सामने पार पडले होते. त्यानंतर काही खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्यामुळे आयपीएल रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आता आयपीएलचं आयोजन होणार का? झालं तर कुठे होणार आणि कधी होणार? यांसारखे अनेक प्रश्न सध्या चाहत्यांच्या मनात आहेत. 4 मेरोजी मंगळवारी आयपीएल गवर्निंग काउंसिलची तातडीची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत बीसीसीआयनं आयपीएल रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. बायो बबलमध्ये असूनही कोरोनाची लागण झाल्यानं बीसीसीआयच्या वतीनं आयपीएलचे उर्वरित सामने अनिश्चित काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला.