ईडन गार्डन्सवर झालेल्या या सामन्यात केकेआरने पंजाबवर 7 धावांनी विजय मिळवला. मात्र या सामन्यात पंजाबच्या गोलंदाजांना एकही विकेट घेता आली नाही.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या कोलकाताने निर्धारित 20 षटकात 3 बाद 164 धावा केल्या होत्या. कोलकाताचे जे तीन फलंदाज बाद झाले, ते धावबादच झाले. त्यामुळे विरोधी संघाचा एकही फलंदाज बाद न करण्याचा अनोखा विक्रम पंजाबच्या गोलंदाजांवर जमा झाला.
कोलकाताचा कर्णधार गौतम गंभीर, रॉबिन उथप्पा आणि आंद्रे रसेल हे तीन खेळाडू बाद झाले. उथप्पाने स्क्वेअरला चेंडू मारल्यानंतर तो मॅक्सवेलने मोठ्या चपळाईने अडवला. तोपर्यंत गंभीरने क्रिज सोडली होती. गंभीरला परत नॉनस्ट्राईक क्रिजला पोहचायला अपयश आल्यामुळे गोलंदाजी करत असलेल्या संदीप शर्माने गंभीरला रनआऊट केले. उथप्पाच्या बाबतीतही तेच झाले. मोहित शर्माने उथप्पाला रनआऊट केले. तर संदीप शर्मानेच पुन्हा रसेलला रनआऊट केले.
या व्यतिरिक्त पंजाबच्या गोलंदाजांना कोलकाताची एकही विकेट घेता आली नाही. पण पंजाबच्या क्षेत्ररक्षकांमुळे कोलकाताला 164 धावांतच रोखता आलं.
सतत पराभवाचा सामना करत असलेल्या पंजाबने कर्णधारपदाची धुरा मुरली विजयकडे सोपवली आहे. त्यानंतर तरी संघात नवचैतन्य येईल अशी अपेक्षा होती. त्यातच गुणतालिकेत सर्वात वरच्या क्रमांकावर असलेल्या गुजरात लायन्सला पराभूत केल्यामुळे मुरली विजयकडून अपेक्षा वाढल्या होत्या. मात्र, केकेआर विरुद्धच्या सामन्यात पंजाबच्या गोलंदाजांनी फॅन्सची साफ निराशा केली.
दरम्यान, पंजाबला 20 षटकांत 9 बाद 156 धावांच करता आल्यामुळे ते विजयापासून 7 धावा दूर राहिले.