कोलकाता : टीम इंडियाचे माजी कर्णधार बिशन सिंह बेदी यांनी आयपीएलमध्ये खर्च केल्या जाणाऱ्या रकमेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. आयपीएल हे मनी लाँड्रिंगचं व्यासपीठ असल्याची टीका त्यांनी केली आहे.


''न्यायमूर्ती लोढा आयोग' आणण्यासाठी आयपीएलच जबाबदार आहे. स्वस्त वस्तू एवढी महाग विकताना कधीही पाहिली नाही. मला काही मिळत नसल्यामुळे मी आयपीएलची प्रतिमा खराब करत असल्याचा आरोप लोक करतात. मात्र तुम्ही मला ठेवू शकता का, याचा प्रयत्न करा,'' असं आव्हानही बिशन सिंह बेदी यांनी दिलं.

कोलकाता साहित्य उत्सवादरम्यान बिशन सिंह बेदी बोलत होते. ''एक विकेट घेण्यासाठी एक कोटी रुपये आणि एक धाव काढण्यासाठी 97 लाख रुपये हे योग्य आहे का? या पैशांच्या विरोधात मी नाही. मात्र खेळाडूंना एखाद्या क्लबकडून खेळण्यासाठी नव्हे, तर देशाकडून खेळण्यासाठी जास्त पैसे मिळावे,'' असंही ते म्हणाले.

''हा सर्व पैसा कुठून येतो आणि कुठे जातो हे कुणाला माहित आहे का? जर हा मनी लाँड्रिंगचा प्रकार नसेल तर आणखी काय आहे, हे मला माहित नाही,'' असा गंभीर आरोपही बिशन सिंह बेदी यांनी केला.