बंगळुरु : इंडियन प्रीमियर लीगच्या दहाव्या मोसमासाठीचा लिलाव सोमवारी (20 फेब्रुवारी 2017) बंगळुरूत होणार असून, त्यात भारतीय खेळाडूंसोबतच इंग्लंड आणि वेस्ट इंडीजच्या खेळाडूंसाठी मोठ्या बोली लागलेल्या पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज ईशांत शर्मा, मुंबईचा युवा फलंदाज पृथ्वी शॉ यांच्यासह यंदा रणजी आणि सय्यद मुश्ताक अली आंतरविभागीय ट्वेन्टी20 साखळीत आश्वासक कामगिरी बजावणाऱ्या भारतीय खेळाडूंसाठी फ्रँचायझी किती बोली लावतात हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल.
यंदा 5 अफगाण खेळाडूंचा समावेश हेही आयपीएलच्या लिलावाचं वेगळं वैशिष्ट्य आहे. या लिलावासाठी तब्बल 799 जणांनी आपलं नाव नोंदवलं होतं. त्यातून फ्रँचायझींनी 351 खेळाडूंची लिलावासाठी निवड केली आहे. मात्र सर्व फ्रँचायझी मिळून 28 विदेशी खेळाडूंसह जास्तीत जास्त 76 खेळाडूच विकत घेऊ शकतात. त्यासाठी फ्रँचायझींकडे एकूण 143 कोटी 33 लाख रुपयांचा निधी उपलब्ध आहे.