RR vs SRH, IPL 2021  Highlights: आयपीएलमध्ये दिल्लीत रंगलेल्या राजस्थान आणि हैदराबाद यांच्यातील सामन्यात राजस्थाननं हैदराबादला 221 धावांचं आव्हान दिलं होतं. या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादचा डाव 165 धावांवर संपुष्टात आला. राजस्थाननं 55 धावांनी हा विजय साजरा करत गुणतालिकेत पाचव्या स्थानावर झेप घेतली आहे. 


221 धावांचं आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादचे सलामीवीर जॉनी बेयरस्टो आणि मनीष पांडेनं चांगली सुरुवात केली. मात्र मनीष पांडे 31 धावांवर बाद झाला तर बेयरस्टो 21 चेंडूत 30 रन करुन आऊट झाला. त्यानंतर आलेला विजय शंकर केवळ 8 धावांवर बाद झाला. पहिल्यांदाच हैदराबादचा कर्णधार झालेला केन विलियमसही 20 काढून बाद झाला.  मोहम्मद नबीनं 5 चेंडूत 17 धावा केल्या.  केदार जाधवनं 19 धावांचं योगदान दिलं. राजस्थानकडून रहिम आणि ख्रिस मॉरीसनं तीन-तीन विकेट घेतल्या.


त्याआधी नाणेफेक जिंकून हैदराबादने राजस्थानला फलंदाजीचे आमंत्रण दिले. राजस्थानचा सलामीवीर फलंदाज जोस बटलरने आयपीएलमधील पहिले शानदार शतक ठोकले.  बटलरच्या तुफानी खेळीमुळे राजस्थानने हैदराबादसमोर 20 षटकात 3 बाद 220 धावा केल्या. 


राजस्थानकडून जोस बटलर आणि यशस्वी जयस्वाल यांनी डावाची सुरुवात केली.  यशस्वीला 12  धावांवर बाद झाला. त्यानंतर  संजू सॅमसन आणि बटलरने राजस्थानला चांगल्या धावा जमवून दिल्या.  सॅमसनला 17व्या षटकात विजय शंकरच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्याने 4 चौकार आणि 2 षटकारांसह 48 धावा केल्या.  बटलरने  संदीप शर्माच्या 19 व्या षटकात 24 धावा काढल्या, पण याच षटकाच्या शेवटच्या चेंडूवर तो बाद झाला. त्याने 64 चेंडूत 11 चौकार आणि 8 षटकारांसह 124 धावांची खेळी केली.