गोंदिया : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची आकडेवारी फसली, बंगालच्या जनतेने भाजपला नाकारलं आहे. आतातरी अमित शाहांनी राजीनामा द्यावा, अशी प्रतिक्रिया पश्चिम बंगाल निकालावर राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांचे कल हाती आले असून ममत बॅनर्जी पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदावर विराजमान होताना दिसत आहेत.
काय म्हणाले मंत्री नवाब मलिक?
पश्चिम बंगालमध्ये गेल्या तीन वर्षांपासून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आभास निर्माण करून नेहमीच आकडे फेकून 'अबकी बार दो सौ के पार' असे राजकारण करत होते. याचे उत्तर त्यांनी दिले पाहीजे. देशात जी परीस्थिती कोविडच्या बाबतीत निर्माण झाली आहे. ज्याची जबाबदारी स्विकारून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाहांनी राजीनामा द्यावा, असं ममता दिदींनी म्हटलं होत. मात्र, अमित शाहांनी जेव्हा बंगालची जनता आम्हाला नाकारेल, तेव्हाच राजीनामा देऊ असं म्हटल होत. तेव्हा आता बंगालच्या जनतेने त्यांचा राजीनामा मागीतला आहे. त्यामुळे अमित शाहांनी आतातरी राजीनामा द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी गोंदियात केली आहे.
तर पंढरपूर पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव झाला आहे. या निवडणुकीत ज्या चुका झाल्या त्या चुका राष्ट्रवादी दुरूस्त करण्याचा प्रयत्न करेल, अशी प्रतिक्रिया नवाब मलिक यांनी पंढरपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत झालेल्या पराभवानंतर दिली.
नंदीग्राममध्ये पुन्हा मतमोजणीची मागणी
देशाचे लक्ष लागून असलेल्या नंदीग्राममध्ये तृणमूलच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी आणि भाजपचे शुभेन्दु अधिकारी यांच्यात अटीतटीची लढत झाली. शेवटपर्यंत रोमांचक ठरलेल्या या लढतीत ममता बॅनर्जी यांचा 1953 मतांनी पराभव झाला आहे. मात्र आधी ममता बॅनर्जी यांचा विजय झाला असल्याची माहिती समोर आली होती. याबाबत बोलताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, मी निकाल मान्य करते. पण निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर काहीतरी छेडछाड करण्यात आल्याची माहिती माझ्याकडे असून याविरोधात कोर्टात जाणार आहे. मी सत्य समोर आणणार आहे, असं ममता बॅनर्जी म्हणाल्या. यासंदर्भात एएनआयनं ट्वीट केलं आहे. दरम्यान नंदीग्रामध्ये फेर मतमोजणीची मागणी ममता बॅनर्जी यांनी केली आहे.