IPL 2021, MI vs SRH : आज चेन्नईमध्ये मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद यांच्यात लढत होणार आहे. मागील दोन सामन्यात धावांचा पाठलाग करताना पराभवाचा सामना करावा लागलेल्या हैदराबादला पहिल्या विजयाची आशा आहे. तर कोलकात्याविरोधात मागील सामना जिंकल्यानंतर आत्मविश्वास वाढलेली रोहित ब्रिगेड हा सामना जिंकून गुणतालिकेत नंबर एकवर जाण्यास उत्सुक आहे.
संघाच्या कामगिरीसोबत विशेष लक्ष असेल ते हैदराबादचा कर्णधार डेविड वॉर्नर आणि मुंबईचा धडाकेबाज कायरन पोलार्डच्या कामगिरीकडे. हे दोन्ही दिग्गज खेळाडू आपल्या विक्रमापासून काही पावलं दूर आहेत. वॉर्नरने जर आज अर्धशतक ठोकले तर आयपीएलमध्ये 50 अर्धशतके झळकावणारा तो पहिला खेळाडू ठरणार आहे. या यादीत दुसऱ्या नंबरवर शिखर धवन आहे. शिखरने आतापर्यंत आयपीएलमध्ये 42 अर्धशतके झळकावली आहेत. तर वॉर्नरला आणखी एक विक्रम खुनावत आहे. वॉर्नरला 200 षटकार पूर्ण करण्यासाठी 5 षटकारांची आवश्यकता आहे.
कायरन पोलार्डलाही आयपीएलमध्ये 200 षटकार पूर्ण करण्यासाठी 2 षटकारांची आवश्यकता आहे. त्याला आज फलंदाजी करण्याची संधी मिळाली तर तो नक्कीच हा विक्रम करेल, अशी आशा आहे.
हैदराबादला विजयाची वाट तर मुंबई ब्रिगेडही सज्ज
हैदराबादला यंदाच्या हंगामातील पहिल्या दोन्ही सामन्यांत धावांचा पाठलाग करण्यात अपयश आले आहे. बंगळुरुविरोधात तर दीडशे धावसंख्येचे आव्हानही ते पार करु शकले नाहीत. आजच्या सामन्यात वृद्धिमान साहाऐवजी प्रियम गर्ग, अभिषेक शर्मा किंवा केदार जाधवचा संघात समावेश होऊ शकतो. वॉर्नर, बेअरस्टो, राशीद खान यांच्याकडूनच चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. तसेच मनीष पांडे आणि अब्दुल समदच्या खेळीकडेची सर्वांचे लक्ष आहे. गोलंदाजीत टी. नटराजन, भुवनेश्वर कुमारलाही विशेष चमक दाखवता आलेली नाही.
दुसरीकडे मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा, क्विंटन डीकॉक, सूर्यकुमार यादव आणि इशान किशनसह पांड्या ब्रदर्सकडून चांगल्या कामगिरी अपेक्षा मुंबईला आहे. फलंदाजांची मजबूत फळी असताना देखील मुंबईला मागील दोन सामन्यात 160 च्या वर धावा करता आलेल्या नाहीत. मागील सामन्यातील सामनावीर राहुल चहर याच्यासह जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट, मार्को जॅन्सेन यांच्याकडून गोलंदाजीत विशेष अपेक्षा असतील.