IPL 2021, RR vs PBKS : आज आयपीएलमधील चौथा सामना पंजाब किंग्स आणि राजस्थान रॉयल्स हे दोन संघ आमनेसामने येणार आहेत. पंजाबचं नेतृत्व केएल राहुलकडे आहे, तर यंदा पहिल्यांदाच संजू सॅमसन राजस्थान रॉयल्सची धुरा सांभाळणार आहे. मागील आयपीएलमध्ये राजस्थानचा संघ गुणतालिकेत आठव्या स्थानावर फेकला गेला होता.
राजस्थान रॉयल्सकडे जोस बटलर, बेन स्टोक्ससह कर्णधार संजू सॅमसन, यशस्वी जैयस्वाल यांच्याकडून तडाखेबाज खेळीची अपेक्षा आहे. संघात राहुल तेवतिया, ख्रिस मॉरिस, श्रेयस गोपाल असे तगडे ऑलराऊंडर आहेत. त्याचबरोबर मुस्ताफिजुर रहमान, कार्तिक त्यागी, चेतन सकारिया असे गोलंदाज आहे. स्टार गोलंदाज जोफ्रा आर्चर हा सामना खेळू शकणार नाही.
दुसरीकडे पंजाब किंग्सकडे केएल राहुल, ख्रिस गेल, मयंक अग्रवाल, निकोलस पूरन, दीपक हुड्डा अशी तगड्या फलंदाजांची फौज आहे. तर मोहम्मद शमी, झाय रिचर्डसन असे अनुभवी गोलंदाज देखील आहेत. गेल्या आयपीएलमध्ये पंजाब किंग्सची कामगिरीही सुमारच राहिली. 14 सामन्यांपैकी 8 सामन्यात त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. यंदा दोन्ही संघ चांगली कामगिरी करण्यासाठी प्रयत्नशील असतील.
संभाव्य संघ
रायस्थान रॉयल्स: संजू सॅमसन (कर्णधार), जोस बटलर, यशस्वी जैयस्वाल, बेन स्टोक्स, राहुल तेवतिया, शिवम दुबे, ख्रिस मॉरिस, श्रेयस गोपाळ, मुस्ताफिजुर रहमान, कार्तिक त्यागी, चेतन सकारिया
पंजाब किंग्स: केएल राहुल (कर्णधार), ख्रिस गेल, मयंक अग्रवाल, निकोलस पूरन, शाहरूख खान, दीपक हुड्डा, ख्रिस जॉर्डन, अर्शदीप सिंह, रवि बिश्नोई, मोहम्मद शमी, झाय रिचर्डसन