चंद्रपूर : रुग्णालयाच्या चकरा मारूनही बेड न मिळाल्याने रुग्णाचा स्वतःच्या कारमध्ये मृत्यू झाल्याची संतापजनक घटना पुन्हा एकदा चंद्रपूर जिल्ह्यात उघडकीस आली आहे. कालच ब्रम्हपुरी येथे बेड न मिळाल्याने प्रवासी निवाऱ्यात तडफडून एका कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला होता यामुळे चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना आणीबाणी निर्माण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. 


चंद्रपूर शहरातील नगीनाबाग परिसरात राहणारे प्रविण दुर्गे (40) यांची प्रकृती काल बिघडल्यानंतर त्यांनी नातेवाईकांसह रुग्णालयात बेडसाठी चकरा मारल्या. मात्र त्यांना कुठेच बेड मिळाला नाही. अखेर त्यांनी अशा अवस्थेत शासकीय कोविड रुग्णालयापुढे वाहन उभे करून बेड साठी प्रयत्न सुरू ठेवले. त्यातच त्यांची ऑक्सिजन पातळी खालावली आणि उपचाराअभावी त्यांचा ऑल्टो गाडीतच मृत्यू झाला. या धक्कादायक घटनेनंतर नातेवाईकांनी शासकीय कोविड रुग्णालय परिसरात एकच टाहो फोडला.


उपचाराविना एका कोरोना रुग्णाचा प्रवासी निवाऱ्यात तडफडून मृत्यू झाल्याची संतापजनक घटना चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी शहरात रविवारी उघडकीस आली होती. गोविंदा निकेश्वर असं या 50 वर्षीय मृतकाचे नाव असून या रुग्णाला नागपूर जिल्ह्यातील आंभोरा येथून उपचारासाठी ब्रम्हपुरी येथे आणले होते. मात्र कुठेच बेड न मिळाल्याने त्या रुग्णाने ख्रिस्तानंद रुग्णालया समोर असलेल्या प्रवासी निवाऱ्याचा आसरा घेतला आणि तिथेच त्याचा उपचाराविना मृत्यू झाला. विशेष म्हणजे ब्रम्हपुरी हा राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांचा मतदारसंघ आहे आणि त्यांच्यात मतदारसंघात एका कोरोना रुग्णावर उपचाराविना तडफडून मरण्याची वेळ आली.


चंद्रपूर जिल्ह्यात दररोज 1200 कोरोना रुग्णांची नोंद होत असून सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 12 हजारांच्या घरात आहे. मात्र जिल्ह्यात कोरोना स्फोट झाल्यानंतरदेखील आरोग्य यंत्रणा ढिम्म असून या कालावधीत ना खाटा वाढल्या- ना ऑक्सिजन-ना व्हेंटिलेटर. याच मुळे चंद्रपूर जिल्ह्यातील एका कोरोना रुग्णाला बेडसाठी चंद्रपूर-तेलंगणा-चंद्रपूर असा क्लेशदायक प्रवास करावा लागला होता तर एका कोरोना बाधीत वृद्धाची शासकीय कोविड उपचार केंद्राबाहेर परवड झाल्याचं विदारक चित्र पाहायला मिळालं होतं. रमेश स्वान असं या 75 वर्षीय कोरोना बाधित वृद्धाचे नाव असून तब्बल 9 तास शासकीय कोविड उपचार केंद्राबाहेर ते फूटपाथ वर पडून होते. त्यामुळे जिल्ह्यात अनेकांची अवस्था 'कुणी बेड देता का बेड' अशी झाली आहे. पालकमंत्री अवैध धंदे करणाऱ्यांना मदत करण्यात व्यस्त असल्यामुळे त्यांचे जिल्ह्याच्या ढासळत्या आरोग्यव्यवस्थेकडे लक्ष नाही असा सणसणीत आरोप या सर्व घटनांनंतर विरोधकांनी केलाय.