KKR vs CSK, IPL 2021 1st Innings Highlights: मुंबईच्या वानखेडे स्टेडियम सुरू असलेल्या सामन्यात चेन्नईने कोलकातावर 18 धावांनी विजय मिळवला आहे. आजचा सामना जिंकून चेन्नईने विजयाची हॅटट्रिक  साजरी केली आहे. चेन्नईनं कोलकात्यासमोर 220 धावांचं आव्हान ठेवलं होतं. या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकात्याचा डाव 202 धावांवर आटोपला. 


220 धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या कोलकात्याकडून एकाही खेळाडूला मोठी खेळी करता आली नाही. शेवटी आंद्रे रसेलनं काही आक्रमक फटके मारत आशा निर्माण केली मात्र तो यशस्वी होऊ शकला नाही. रसेलने 54 धावांची खेळी केली.  रसेलनंतर कार्तिकही  40 धावांवर बाद झाला.कोलकाताने पहिल्या पॉवरप्लेमध्ये आपले अर्धे फलंदाज गमावले होते. 


चेन्नईकडून मराठमोळा ऋतुराज गायकवाड आणि फाफ डु प्लेसिस यांनी धडाकेबाज सुरुवात करत चेन्नईच्या धावसंख्येचा पाया रचला. पहिल्या 5 षटकात या दोघांनी चेन्नईच्या 44 धावा फलकावर लावल्या.  ऋतुराज गायकवाडने आपले पाचवे अर्धशतक पूर्ण केले. आक्रमक झालेला ऋतुराज अर्धशतकानंतर बाद झाला.  ऋतुराजने 6 चौकार आणि 4 षटकारांसह 64 धावांची खेळी केली.


ऋतुराज आणि डु प्लेसिसने पहिल्या गड्यासाठी 115 धावांची भागीदारी केली. ऋतुराज बाद झाल्यानंतर प्लेसिसने अर्धशतक पूर्ण केले. ऋतुराजनंतर मैदानात आलेल्या मोईन अलीने आक्रमक फलंदाजी करत छोटी का होईना पण धडाकेबाज खेळी केली. त्याने डु प्लेसिससोबत 26 चेंडूत अर्धशतकी भागीदारी रचली. कोलकाताचा फिरकीपटू सुनील नरिनला मोठा फटका खेळण्याच्या नादात तो यष्टिचीत झाला. मोईन अलीने 12 चेंडूत 25 धावा केल्या


मोईन अली बाद झाल्यानंतर मैदानात आलेला महेंद्रसिंह धोनी आज आक्रमक पाहायला मिळाला. त्यानं 8 चेंडूत 17 धावा केल्या शेवटच्या षटकात डु प्लेसिसने पॅट कमिन्सला 2 षटकार ठोकले. मात्र, त्याला शतक पूर्ण करता आले नाही. फाफ डु प्लेसिसने 60 चेंडूत 9 चौकार आणि 5 षटकारांसह नाबाद 95 धावांची खेळी केली.