IPL 2020 KKR vs MI: आयपीएल 2020 चा पाचवा सामना आज मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळवला जाणार आहे. थोड्याच वेळात अबूधाबी येथे हा सामना रंगणार आहे. गतविजेत्या मुंबई इंडियन्सची मोसमातील सुरुवात पराभवाने झाली आहे. त्यामुळे मोसमातील पहिला विजय मिळवण्याच्या उद्देशाने मुंबईचा संघ मैदानात उतरेल. तर कोलकाताची विजयासह मोसमाची सुरुवात करण्याचा प्रयत्न करेल. आजच्या सामन्यात कोणते रेकॉर्ड बनू शकतात किंवा मोडले जाऊ शकतात, पाहुयात.


मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने आयपीएलमध्ये आजवर 294 षटकार लगावले आहेत. त्यामुळे त्याने आज कोलकाता विरुद्ध सहा षटकार ठोकले तर आयपीएलमध्ये 200 षटकार ठोकणारा तो चौथा फलंदाज ठरेल. आयपीएलमध्ये याआधी ख्रिस गेल, एबी डिव्हिलियर्स आणि एमएस धोनी यांनी ही कामगिरी केली आहे. तसेच रोहितने या सामन्यात 90 धावा केल्या तर तो आयपीएलमधील आपल्या 5 हजार धावा पूर्ण करेल. असं झाल्यास रोहित आयपीएलमध्ये 5 हजार धावांचा टप्पा गाठणारा तिसरा खेळाडू ठरेल. आतापर्यंत फक्त विराट कोहली आणि सुरेश रैना यांनी ही कामगिरी केली आहे.


आयपीएलमध्ये मुंबईकडून सूर्यकुमार यादवने 953 धावा केल्या आहेत. आज त्याने कोलकाता विरुद्ध 47 धावा केल्या तर तो मुंबईसाठी 1000 धावा पूर्ण करेल. मुंबईसाठी आतापर्यंत केवळ 10 फलंदाजांनी 1 हजार धावांचा टप्पा पार केला आहे.


मुंबई इंडियन्सचा कायरन पोलार्ड आजचा आयपीएलचा 150 वा सामना असेल. आयपीएलमध्ये एकाच संघासाठी दीडशे सामने खेळणारा तो पहिला परदेशी खेळाडू ठरला आहे. आतापर्यंत तीन भारतीय क्रिकेटपटूंनी ही कामगिरी केली आहे.





कोलकाता नाईट रायडर्सच्या सुनील नरेनने या सामन्यात सहा षटकार लगावले तर केकेआरसाठी तो आपले 50 षटकार पूर्ण करू शकतो. यासह दिनेश कार्तिकने या सामन्यात दोन स्टंपिंग्स घेतल्या तर टी -20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक स्टम्पिंग्स घेणारा तो तिसरा विकेटकीपर बनेल.