आयपीएल 2019 : हैदराबादची पंजाबवर 45 धावांनी मात, वॉर्नरची बॅट पुन्हा तळपली
एबीपी माझा वेब टीम | 30 Apr 2019 12:04 AM (IST)
आयपीएलच्या आजच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने किंग्ज इलेव्हन पंजाबला 45 धावांनी धुळ चारली आहे.
हैदराबाद : आयपीएलच्या आजच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने किंग्ज इलेव्हन पंजाबला 45 धावांनी धुळ चारली आहे. हैदराबादचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरच्या धडाकेबाज 81 धावांच्या खेळीच्या जोरावर हैदराबादने आज पंजाबसमोर 212 धावांचा डोंगर उभा केला होता. 213 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या पंजाबचा डाव 8 बाद 167 धावांवर आटोपला. आज खेळण्यात आलेला सामना हा डेव्हिड वॉर्नरचा यंदाच्या आयपीएलमधील अखेरचा सामना आहे. या सामन्यानंतर वॉर्नर मायदेशी परतणार आहे. शेवटच्या सामन्यातदेखील वॉर्नरची बॅट चांगलीच तळपल्याचे पाहायला मिळाले. वॉर्नरने 56 चेंडूत 7 चौकार आणि 2 षटकारांसह 81 धावांची धडाकेबाज खेळी केली. वॉर्नरसह हैदराबादकडून मनिष पांडेने (25 चेंडूत 36 धावा) चांगली खेळी केली. हैदराबादचे 213 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या पंजाबची सुरुवात खराब झाली. पंजाबने तिसऱ्याच षटकात विस्फोटक फलंदाज ख्रिस गेलची(4) विकेट गमावली. त्यानंतर लोकेश राहुल (56 चेंडूत 79) आणि मयांक अग्रवालने (27) अर्धशतकी भागिदारी केली. परंतु त्यानंतर ठराविक अंतराने पंजाबजे फलंदाज बाद होत गेले. पंजाबचा डाव 8 बाद 167 धावांवर संपुष्टात आला. हैदराबादच्या फलंदाजांसह गोलंदाजांनीदेखील आज चमकदार कामगिरी केली. खलील अहदने 40 धावांत 3, रशीद खानने 21 धावांत 3 आणि संदीप शर्माने 33 धावांत 2 बळी घेतले.