सॅन्टनरचा अखेरच्या चेंडूवर षटकार, चेन्नई सुपरकिंग्जची राजस्थान रॉयल्सवर मात
एबीपी माझा वेब टीम | 12 Apr 2019 12:02 AM (IST)
यंदाच्या आयपीएलमध्ये सहापैकी चार सामन्यात राजस्थानला पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. त्यामुळे स्पर्धेतलं त्यांचं आव्हान संपुष्टात आलं. दुसरीकडे सात सामन्यात सहा विजय मिळवून चेन्नई गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे.
जयपूर : मिचेल सॅन्टनरने अखेरच्या चेंडूवर ठोकलेल्या षटकारामुळे चेन्नई सुपर किंग्सला राजस्थान रॉयल्सवर सनसनाटी विजय मिळवून दिला. या सामन्यात चेन्नईने राजस्थानवर चार विकेट्सनी विजय मिळवला. जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या या सामन्यात राजस्थानने चेन्नईला विजयासाठी 152 धावांचं आव्हान दिलं होतं. चेन्नईला विजयासाठी अखेरच्या चेंडूवर तीन धावांची गरज असताना मिचेल सॅन्टनरने बेन स्टोक्सला विजयी षटकार ठोकला. या सामन्यात चेन्नईकडून महेंद्रसिंग धोनीने 58 धावा तर अंबाती रायुडूने 57 धावांची मोलाची खेळी केली. त्या दोघांनी पाचव्या विकेटसाठी 95 धावांची भागीदारी रचली. यंदाच्या आयपीएलमध्ये सहापैकी चार सामन्यात राजस्थानला पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. त्यामुळे स्पर्धेतलं त्यांचं आव्हान संपुष्टात आलं. दुसरीकडे सात सामन्यात सहा विजय मिळवून चेन्नई गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे.