मुंबई : जोस बटलरच्या निर्णायक खेळीमुळे राजस्थान रॉयल्सनं मुंबई इंडियन्सचा 4 विकेट्सनी पराभव केला आहे. यंदाच्या आयपीएलमधला राजस्थानचा हा दुसरा विजय ठरला. या सामन्यात मुंबईनं पंजाबसमोर 188 धावांचं आव्हान ठेवलं होतं. राजस्थाननं हे आव्हान चार विकेट्स आणि तीन चेंडू राखून पार केलं.


जोस बटलरनं 43 चेंडूत सहा चौकार आणि सात षटकार ठोकत 89 धावांची खेळी उभारली. त्यानं रहाणेसह 60 तर संजू सॅमसनसह 87 धावांची भागीदारी रचली. रहाणेनं 37 तर संजू सॅमसननं 31 धावांचं योगदान दिलं. मुंबईकडून कृणाल पांड्याने 3, जसप्रीत बुमराहने 2 तर राहुल चहरने 1 विकेट घेतली.


त्याआधी क्विंटन डी कॉकच्या दमदार फलंदाजीमुळे मुंबई इंडियन्सला 188 धावांचा पल्ला गाठता आला. कर्णधार रोहित शर्मा आणि डी कॉकनं सुरुवातीपासूनच राजस्थानच्या गोलंदाजीवर वर्चस्व गाजवलं.


डी कॉकनं 52 चेंडूत सहा चौकार आणि चार षटकारांसह 81 धावांची खेळी केली. तर रोहितनं 32 चेंडूत 47 धावा फटकावल्या. या दोघांनी 96 धावांची सलामी दिली. त्यानंतर आलेल्या हार्दिक पंड्यानं 28 धावा केल्या. राजस्थानकडून जोफ्रा आर्चरनं तीन फलंदाजांना माघारी धाडलं.