मुंबई : टीम इंडियाचा मॅचविनर फिरकीपटू कुलदीप यादवला आयपीएलमधील सामन्यात भरमैदानातच रडू कोसळलं. मोईन अलीला एका षटकात 27 धावा दिल्यामुळे कुलदीपच्या अश्रूंचा बांध फुटला. कुलदीपला चार षटकात 59 धावा ठोकून फलंदाजांनी अक्षरशः धुतला
शुक्रवारी झालेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून दहा धावांनी पराभव स्वीकारावा लागला. बंगळुरुने या सामन्यात कोलकात्यासमोर 214 धावांचं मोठं आव्हान ठेवलं होतं. या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकात्याला पाच बाद 203 धावांपर्यंतच मजल मारता आली.
आपल्या फिरकीच्या जोरावर फलंदाजांच्या नाकी नऊ आणणाऱ्या कुलदीप यादवला या सामन्यात मोठा हादरा बसला. विशेष म्हणजे विश्वचषकाला अवघा सव्वा महिना उरल्यामुळे कुलदीप बावचळून गेला.
मोईन अलीला सोळाव्या षटकात 4,6,4,6,6 अशा धावा दिल्यामुळे बंगळुरुची गाडी 122 वरुन एका षटकातच 149 धावांवर पोहचली. कुलदीपने टाकलेल्या चार षटकांमध्ये बंगळुरुच्या फलंदाजांनी 59 धावा ठोकल्या. यापैकी 50 धावा तर केवळ षटकार आणि चौकारांच्या जोरावरच करण्यात आल्या होत्या.
वाईट कामगिरीमुळे निराश झालेल्या कुलदीप यादवच्या भावनांचा बांध फुटला. इतर खेळाडूंनी कुलदीपला कसंबसं शांत केलं.
मात्र त्याचा आत्मविश्वास ढासळला होता. 20 व्या षटकात दुसऱ्या चेंडूवर कुलदीपच्या मिस फील्डिंगचा फटका पुन्हा संघाला बसला. पाचव्या चेंडूवर तर कुलदीपच्या ढिसाळ क्षेत्ररक्षणानंतर कोहलीने जल्लोष सुरु केला होता.
कुलदीपच्या सुमार क्षेत्ररक्षणामुळे कोहलीचं आयपीएलमध्ये पाचवं शतक पूर्ण झालं. त्यामुळे एकीकडे स्टेडिअममध्ये टाळ्यांचा कडकडाट सुरु असताना, कुलदीप मात्र कोपऱ्यात रडत होता.
कुलदीपच्या नावे लज्जास्पद विक्रम
कुलदीप यादवच्या नावे आयपीएलमध्ये लज्जास्पद विक्रम जमा झाला आहे. कुलदीप हा आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा देणारा भारतीय स्पिनर ठरला आहे. 2016 मध्ये कर्ण शर्माने 57 धावा देण्याचा विक्रम केला होता, तो आता कुलदीपच्या नावे जमा झाला आहे. इमरान ताहिरने 2016 मध्ये 59 धावा, तर रवींद्र जाडेजाने 2017 मध्ये 59 धावा दिल्या आहेत.
कोलकात्याकडून नितिश राणाने नऊ चौकार आणि पाच षटकारांसह नाबाद 85 धावांची खेळी केली. तर आंद्रे रसेलने 25 चेंडूत 65 धावा फटकावल्या. या दोघांनी 118 धावांची झुंजार भागीदारी रचून कोलकात्याला विजय मिळवून देण्याचा आटोकाट प्रयत्न केला. पण त्यांचा हा प्रयत्न दहा धावांनी दूर राहिला. कोलकात्याचा हा गेल्या चार सामन्यातला सलग चौथा पराभव ठरला.
मोईन अलीने एका षटकात कुटल्या 27 धावा, कुलदीप यादवला भरमैदानात रडू कोसळलं
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
20 Apr 2019 09:16 AM (IST)
मोईन अलीला सोळाव्या षटकात 4,6,4,6,6 अशा धावा दिल्यामुळे बंगळुरुची गाडी 122 वरुन एका षटकातच 149 धावांवर पोहचली. कुलदीपने टाकलेल्या चार षटकांमध्ये बंगळुरुच्या फलंदाजांनी 59 धावा ठोकल्या.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -