मुंबई/नागपूर : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या चार एप्रिल रोजी नागपूर येथे झालेल्या सभेला गर्दी नसल्याची बातमी काही पत्रकारांनी त्यांच्या माध्यमांद्वारे प्रसारित केली होती. या बातमीनंतर सदर पत्रकारांना धमकी देणाऱ्या तसेच त्यांच्याविरोधात समाजमाध्यमांवर आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या काँग्रेस नेत्यांचा नागपूर युनियन ऑफ वर्किंग जर्नलिस्ट्स, टिळक पत्रकार भवन ट्रस्ट आणि नागपूर प्रेस क्लबने निषेध केला आहे.


एबीपी माझाच्या नागपूरमधील प्रतिनिधी सरिता कौशिक आणि रजत वशिष्ठ यांनी राहुल गांधी यांच्या सभेला गर्दी नसल्याच्या बातमीचे वृत्तांकन केले होते. त्यामुळे संतापलेल्या काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांनी सरिता कौशिक, रजत वशिष्ठ, एबीपी माझाच्या मुंबईतील प्रतिनिधी रश्मी पुराणिक आणि एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर यांच्याविरोधात आक्षेपार्ह लिखाण करुन ट्रोल करण्याचा प्रयत्न केला होता.

नागपूर युनियन ऑफ वर्किंग जर्नलिस्ट्स (एनयूडब्ल्यूजे),महाराष्ट्र युनियन ऑफ वर्किंग जर्नलिस्ट्स (एमयूडब्ल्यूजे), टिळक पत्रकार भवन ट्रस्ट (टीपीबीटी), नागपूर प्रेस क्लब (एनपीसी)या चारही संघटनांना काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांच्या या ट्रोलिंगने मोठा धक्का बसला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे नागपूरचे उमेदवार नाना पटोले यांनी स्वतःदेखील सरिता कौशिक यांना धमकावण्याचा प्रयत्न केला होता. तसेच त्यांच्या कार्यकर्त्यांनी महिला पत्रकाराशी केलेल्या असभ्य आणि गैरवर्तनाचा या चारही संघटनांनी निषेध नोंदवला आहे.

या संघटनांनी त्यांच्या परिपत्रकात नाना पटोले आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी याप्रकरणी पत्रकारांची माफी मागावी, अशी मागणी मांडली आहे. तसेच संबधित लोकांना शिक्षा केली जावी, अशी मागणी पोलीस प्रशासन आणि सायबर सेलकडे करण्यात आली आहे. माध्यमांनी दिलेली बातमी चुकिची ठरवण्यासाठी काही लोकांनी खोटी छायाचित्रं आणि खोटी माहिती समाज माध्यमांवर फॉरवर्ड केली होती. त्यांनादेखील शिक्षा केली जावी, अशी मागणी परिपत्रकाद्वारे मांडण्यात आली आहे.

नाना पटोले आणि त्यांच्या कार्यकर्त्यांविरोधात कडक कारवाई करण्यात यावी, अशी विनंती प्रदीपकुमाक मैत्र(एमयूडब्ल्यूजे आणि एनपीसीचे अध्यक्ष), शिरीष बोरकर (एनयूडब्ल्यूजेचे अध्यक्ष), ब्रह्मशंकर त्रिपाठी (एनयूडब्ल्यूजेचे महासचिव)यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.