हैदराबाद : आयपीएलच्या मैदानात आज चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स या संघांमध्ये विजेतेपदासाठीची लढत रंगणार आहे. हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर संध्याकाळी साडेसात वाजता सामन्याला सुरुवात होईल. सामना संपल्यानंतर विजेतेपदासह सीजनमधील सर्वोत्कृष्ट गोलंदाज आणि फलंदाज कोण ठरणार याची उत्सुकताही सर्वांना लागली आहे.


गोलंदाजीमध्ये पर्पल कॅप कुणाला मिळेल हे सांगता येणं कठीण आहे, पण फलंजादीमध्ये ऑरेंज कॅप सनरायझर्स हैदराबादचा खेळाडू डेविड वॉर्नरला मिळणार हे जवळपास निश्चित झालं आहे. बॉल टेम्परिंगप्रकरणी वॉर्नरवर जवळपास एक वर्ष क्रिकेट बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर क्रिकेटच्या मैदानात उतरलेल्या वॉर्नरची बॅट अशी तळपली की धावांच्या बाबतीत आयपीएलमध्ये त्याच्या जवळपास कोणताही खेळाडू दिसला नाही.



डेविड वॉर्नरने आयपीएल सीजन 12 मध्ये सर्वाधिक धावा ठोकल्या आहेत. वॉर्नरने 12 सामन्यात 69.20 च्या सरासरीने 692 धावा ठोकल्या आहेत. ज्यामध्ये एक शतक आणि आठ अर्धशतकांचा समावेश आहे. वॉर्नर वर्ल्ड कपच्या तयारीसाठी मायदेशी परतल्याने आयपीएलच्या काही सामन्यांना त्याला मुकावं लागलं.


डेविड वॉर्नर ऑरेंज कॅपच्या शर्यतीत सध्या अव्वल स्थानी आहे. तर किंग्ज इलेव्हन पंजाबचा केएल राहुल 593 धावांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. सनरायझर्स हैदराबादचा शिखर धवन 521 धावांसह तिसऱ्या स्थानावर आहे, तर कोलकाता नाईट रायडर्स आंद्रे रसेल 510 धावांसह चौथ्या स्थानावर आहे. मात्र या तीनही खेळाडूंचे संघ स्पर्धेतून बाहेर झाले आहेत.


तर मुंबई इंडियन्स संघातील क्विंटन डी कॉक वॉर्नरपासून 192 धावा मागे आहे. त्यामुळे एका टी-20 सामन्यात एका खेळाडूने 192 धावा करणे अशक्य आहे. अशारीतीने डेविड वॉर्नरलाच ऑरेंज कॅप मिळणार हे निश्चित झालं आहे. ऑरेंज कॅप विजेत्या खेळाडूला 10 लाखांचं बक्षिस मिळणार आहे.


आयपीएलमधील बक्षिसांची रक्कम


विजेता संघ : 20 कोटी रुपये
उपविजेता संघ (रनर-अप) : 12.5 कोटी रुपये
ऑरेंज कॅप (सर्वाधिक धावा करणारा खेळाडू) : 10 लाख रुपये
पर्पल कॅप (सर्वाधिक विकेट घेणारा खेळाडू) : 10 लाख रुपये
मोस्ट वॅल्यूबल प्लेयर ऑफ द ईयर : 10 लाख
इमर्जिंग प्लेयर ऑफ द सिजन : 10 लाख
गेम चेंजर ऑफ द सिजन : 10 लाख
परफेक्ट कॅच ऑफ द सिजन : 10 लाख
स्टाइलिश प्लेयर ऑफ द सिजन : 10 लाख
सुपर स्ट्राइकर ऑफ द सिजन : कार आणि चषक


आणखी वाचा