मुंबई : डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे एका चिमुकल्याची आयुष्याशी झुंज सुरु आहे. वाडिया रुग्णालयातील डॉक्टरांनी गर्भातील बाळाला असलेलं व्यंग वेळीच न ओळखल्यामुळे पांचाळ दाम्पत्याच्या 42 दिवसांच्या बाळाला याचा फटका बसला आहे.

गर्भामध्येच बाळाला असलेलं व्यंग वाडिया रुग्णालयातील डॉक्टरांच्या निष्काळजीमुळे वेळीच लक्षात न आल्याचा आरोप परळचे रहिवासी अमित आणि श्रुतिका पांचाळ यांनी केला आहे. त्यांची मुलगी आता 42 दिवसांची आहे.

लग्नानंतर पाच वर्षांनी गर्भवती राहिलेल्या श्रुतिकाने सुरुवातीपासूनच वाडिया रुग्णालयात उपचार घेतले. आठ महिने पूर्ण झाल्यानंतर श्रुतिका तपासणीसाठी गेली असता बाळाच्या डोक्याला सूज आली असल्याने तातडीने प्रसूती करण्यास डॉक्टरांनी सांगितले. त्यानुसार 28 मार्चला श्रुतिका यांची प्रसूती करण्यात आली आणि त्यांना मुलगी झाली.

जन्मत:च या मुलीच्या मेंदूमध्ये पाणी झाले आहे. तिच्यामध्ये स्पाईन बिफिडा म्हणजेच मज्जारज्जू आणि पाठीचा मणका जोडलेले नाहीत, हा जन्मजात दोष या चिमुकलीच्या शरिरात आहे.

हा जन्मदोष असून यामध्ये मज्जारज्जूची वाढ झालेली नाही. याचा परिणाम मेंदूवरही होण्याची शक्यता असते. गर्भातील बाळामधील व्यंग निदर्शनास आणणारी अ‍ॅनोमॅलिस चाचणी न केल्याने बाळामधील व्यंग वेळेत समजू शकलेले नाही. ही चाचणी डॉक्टरांच्या निष्काळजीमुळे केली गेली नाही, असा पांचाळ कुटुंबाचा आरोप आहे.

वाडिया रुग्णालयाकडून मात्र याबाबत कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आले नाही. पांचाळ कुटुंबिय आता वाडिया रुग्णालय प्रशासनाविरोधात न्यायालयाचे दरवाजे ठोठावणार आहेत.