हैदराबाद : हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर आज आयपीएलचा अंतिम सामना रंगणार आहे. आयपीएलच्या बाराव्या मोसमाचा विजेता कोण ठरणार याची उत्सुकता प्रत्येक क्रिकेटरसिकाला लागून राहिली आहे. चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स या संघात आज रात्री आयपीएलची अंतिम लढत रंगणार आहे.


या लढतीच्या निमित्तानं आयपीएलचा सर्वोत्तम कर्णधार कोण याचंही उत्तर आपल्याला मिळेल. कारण या सामन्याच्या निमित्तानं सर्वाधिक तीन वेळा आयपीएल विजेतेपद पटकावणारे कर्णधार आमनेसामने येणार आहेत.

मुंबई आणि चेन्नई आयपीएल इतिहासात चौथ्यांदा आमनेसामने

मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स आयपीएल इतिहासात चौथ्यांदा आमनेसामने येणार आहेत. मुंबई आणि चेन्नई संघांमध्ये याआधी 2010, 2013 आणि 2015 साली फायनल झाली आहे. त्यात 2010 साली चेन्नईनं तर मुंबईनं 2013 आणि 2015 साली आयपीएलचं विजेतेपद पटकावलं आहे.
IPL Final | आयपीएलच्या अंतिम फेरीत मुंबई-चेन्नई भिडतात, तेव्हा काय होतं?

आयपीएलच्या इतिहासात मुंबई आणि चेन्नई या दोन्ही संघांनी प्रत्येकी तीनवेळा विजेतेपदाचा मान मिळवला आहे. त्यामुळं रिआल माद्रिद विरुद्ध बार्सिलोना फुटबॉल सामन्याच्या धर्तीवर मुंबई आणि चेन्नई संघांमधला आयपीएल सामना हा 'अल क्लासिको' म्हणून ओळखला जातो.

आयपीएलचा सर्वात यशस्वी कर्णधार कोण? धोनी की शर्मा

हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर आयपीएलचा अंतिम सामना रं दोन पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये अर्थात चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई  इंडियन्सदरम्यान रंगणार आहे. महेंद्रसिंग धोनी आणि रोहित शर्मानं आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून आपल्या नावाचा वेगळा ठसा उमटवला आहे. आयपीएलच्या इतिहासात धोनी आणि रोहितनं प्रत्येकी तीन वेळा आपापल्या संघांना विजेतेपद मिळवून दिलं आहे. त्यामुळे सर्वाधिक विजेतीपदं मिळवणारा कर्णधार कोण ठरणार याची क्रिकेट रसिकांमध्ये उत्सुकता आहे.

2010  साली धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईनं पहिल्यांदा आयपीएलचं विजेतेपद पटकावलं होतं. त्यानंतर 2011 आणि 2018 साली चेन्नईनं आयपीएल ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं होतं. चेन्नईचा आयपीएलमधल्या यशाचा आलेख पाहता या संघानं नऊपैकी सातवेळा अंतिम फेरीत धडक मारली आहे.

रोहित शर्मानं मुंबई इंडियन्सला 2013 साली आयपीएलचं पहिलं विजेतेपद मिळवून दिलं. तेही तब्बल सहा वर्षांच्या प्रतिक्षेनंतर. त्यानंतर 2015 आणि 2017 साली मुंबईच्या संघानं रोहितच्याच नेतृत्वात त्याची पुनरावृत्ती केली. मुंबईनं गेल्या अकरा मोसमात चार वेळा आयपीएलची अंतिम फेरी गाठली आहे.

मुंबई ठरली आहे वरचढ
मुंबई आणि चेन्नई या दोन तुल्यबळ संघांमध्ये आजवर 29 लढती खेळवण्यात आल्या आहेत. त्यात धोनीच्या चेन्नईनं 12 तर रोहितच्या मुंबईनं 17 सामन्यांमध्ये बाजी मारली आहे. आयपीएलच्या अंतिम सामन्यांतही तीनपैकी दोन वेळा मुंबईच किंग ठरली आहे. तर यंदाच्या आयपीएलमध्येही साखळी आणि क्वालिफायर अशा तिन्ही सामन्यात मुंबईनं चेन्नईला पाणी पाजलं आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात यशस्वी कर्णधार अशी महेंद्रसिंग धोनीची ख्याती आहे. पण आयपीएलमध्ये मुंबईविरुद्ध आतापर्यंतचा प्रवास पाहता या सर्वोत्तम कर्णधाराला अंतिम सामन्याच्या निमित्तानं खास रणनीतीची आखण्याची गरज आहे. अन्यथा रोहित शर्मा हा आयपीएलचा सर्वोत्तम कर्णधार ठरला तर आश्चर्य वाटण्याची गरज नाही.
IPL Final | आयपीएलच्या अंतिम फेरीत मुंबई-चेन्नई भिडतात, तेव्हा काय होतं?