मुंबई : सलामीचा पृथ्वी शॉ आणि यष्टिरक्षक रिषभ पंतच्या धडाकेबाज फलंदाजीने एलिमिनेटर सामन्यात दिल्ली कॅपिटल्सला सनसनाटी विजय मिळवून दिला आहे. दिल्लीने या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा दोन विकेट्सनी पराभव केला.


दिल्लीच्या विजयात पृथ्वी शॉ आणि रिषभ पंत यांच्या फलंदाजीचा वाटा मोलाचा ठरला. पृथ्वीने 38 चेंडूंमध्ये सहा चौकार आणि दोन षटकारांसह 56 धावांची खेळी उभारली. रिषभ पंतने 21 चेंडूंमध्ये 49 धावांची खेळी उभारली. त्याच्या खेळीला दोन चौकार आणि पाच षटकारांचा साज होता.

त्याआधी, या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने वीस षटकांत आठ बाद 162 धावांची मजल मारली होती. सलामीच्या रिद्धिमान साहाचा अपवाद वगळता हैदराबादच्या प्रमुख फलंदाजांनी धावांची गती चांगली राखली. मार्टिन गप्टिलने 36, मनीष पांडेने 30, केन विल्यमसनने 28, विजय शंकरने 25 आणि मोहम्मद नबीने 20 धावांची खेळी उभारली. त्यामुळे हैदराबादच्या डावात मोठी भागीदारी न होताही त्यांना दिल्लीसमोर एक चांगलं आव्हान उभं करता आलं होतं.

दरम्यान, एलिमिनेटर सामन्यातल्या पराभवाने हैदराबादचं आयपीएलमधलं आव्हान संपुष्टात आलं आहे. आता शुक्रवारी होणाऱ्या क्वालिफायर टू सामन्यात दिल्लीचा मुकाबला चेन्नईशी होईल.