दिल्ली : आयपीएलमधील आजच्या सामन्यात श्रेयस अय्यरच्या दिल्ली कॅपिटल्सने विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बँगलोरला धूळ चारली आहे. दिल्लीने आयपीएलच्या यंदाच्या मोसमातील 8 वा विजय साजरा करत प्ले ऑफमध्ये प्रवेश केला आहे. चेन्नईनंतर प्ले ऑफमधील स्थान पक्क झालेला दिल्ली दुसरा संघ ठरला आहे.


आजच्या सामन्यात दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना 5 वाद 187 धावांचा डोंगर उभा केला होता. परंतु दिल्लीने दिलेले 188 धावांचे आव्हान बँगलोरच्या संघाला पेलवले आहे. विराट कोहलीच्या बँगलोरचा डाव 7 बाद 171 धावांवर संपुष्टात आला.

विराट कोहली (17 चेंडूत 23)आणि पार्थिव पटेल (20 चेंडूत 39) या जोडीने पहिल्या विकेटसाठी 63 धावांची अर्धशतकी भागीदारी केली. 63 धावांवर पार्थिव पटेल बाद झाल्यानंतर ठराविक अंतराने विराट कोहली, एबी डिव्हीलियर्स, शिवम दुबे, हेन्रिच क्लासेन हे फलंदाज पव्हेलियनमध्ये परतले. परंतु कोणालाही मोठी खेळी साकारता आली नाही.

अखेरच्या काही षटकात गुरकिरत मान (19 चेंडूत 27) आणि मार्कस स्टॉयनीस (24 चेंडूत 32) या दोघांनी चांगली फटकेबाजी करत विजयाच्या आशा पल्लवित ठेवल्या होत्या. परंतु त्यांना विजय मिळवता आला नाही. दिल्लीकडून अमित मिश्रा आणि कगिसो रबाडाने प्रत्येकी 2 तर इशांत शर्मा, अक्षर पटेल, शेरफन रुदरफोर्ड यांनी प्रत्येकी 1-1 बळी घेतला.

तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना दिल्लीच्या खेळाडूंनी चांगली फलंदाजी केली. दिल्लीकडून सलामीवर शिखर धवन (37 चेंडूत 50) आणि कर्णधार श्रेयस अय्यरच्या (37 चेंडूत 50)अर्धशतकांच्या जोरावर दिल्लीला 187 धावांपर्यंत मजल मारता आली. अखेरच्या षटकात रुदरफोर्डने (13 चेंडूत 28)जोरदार फटकेबाजी केली. बँगलोरकडून युजवेंद्र चहलने 2, तर उमेश यादव, वॉशिंग्टन सुंदर आणि नवदीप सैनीने प्रत्येकी 1-1 बळी घेतला.