मुंबई : मुंबईच्या सिद्धेश लाडने अखेर चार वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आयपीएलमध्ये पदार्पण केले. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या पंजाबविरुद्धच्या सामन्यात सिद्धेशला कर्णधार रोहित शर्माच्या जागी सलामीला खेळण्याची संधी मिळाली. सामना सुरु होण्यापूर्वी रोहितच्याच हस्ते सिद्धेशला मुंबई इंडिन्सची कॅप देण्यात आली.


2015 साली मुंबई इंडियन्सने सिद्धेश लाडला आयपीएलच्या लिलावत विकत घेतले होते. त्यानंतर पुढचे चारही मोसम लाड केवळ मुंबईच्या ड्रेसिंग रुमचाच सदस्य होता. यंदाच्या लिलावात लाडला पुन्हा एकदा मुंबईकडून बोली लागली होती. आणि तब्बल चार वर्षांनंतर त्याला आयपीएलमध्ये पहिला सामना खेळण्याची संधी मिळाली.

सिद्धेशने पदार्पणातल्या पहिल्याच सामन्याची सुरुवात पहिल्याच चेंडूवर शानदार षटकार मारुन केली खरी, परंतु त्याला मोठी खेळी साकारता आली नाही. एका षटकारानंतर पुढच्या चेंडूवर त्याने चौकार मारला. लाडने 13 चेंडूत 15 धावांची खेळी साकारली.

सिद्धेशचा जन्म 23 मे 1992 रोजी मुंबईत झाला. सिद्धेश हा एक ऑल राऊंडर खेळाडू आहे. सिद्धेशने स्थानिक क्रिकेटमध्ये चांगल्या खेळाचे प्रदर्शन केल्यामुळे त्याला आयपीएलमध्ये संधी मिळाली आहे. परंतु आयपीएलमधल्या डेब्यूसाठी सिद्धेशला तब्बल 1 हजार 514 दिवसांची वाट पाहावी लागली आहे.