चंदीगड: ख्रिस गेलच्या वादळी खेळीमुळे किंग्स इलेव्हन पंजाबनं आयपीएलच्या चुरशीच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सवर अवघ्या चार धावांनी विजय मिळवला.


ख्रिस गेलनं यंदाच्या मोसमातला आपला पहिलाच सामना खेळताना दमदार अर्धशतकी खेळी केली. त्यानं 33 चेंडूत सात चौकार आणि चार षटकारांसह 63 धावा फटकावल्या. गेलच्या या खेळीमुळे किंग्स इलेव्हनला 20 षटकांत सात बाद 197 अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारता आली.

या आव्हानाचा पाठलाग करताना, धोनीच्या चेन्नईला 5 बाद 193 धावाच करता आल्या. धोनीने नाबाद 79 धावा करत एकाकी झुंज दिली. धोनीने सहा चौकार आणि पाच षटकार लगावले, मात्र त्याच्या खेळीला विजयी टिळा लागला नाही.



गेल वादळ परतलं

दरम्यान, आयपीएलमध्ये यंदाच्या मोसमात पहिलाच सामना खेळणाऱ्या ख्रिस गेलने धमाका केला. यापूर्वी विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून खेळणाऱ्या गेलला, यंदाच्या लिलावात मोठी किंमतच मिळाली नाही. गेलला त्याच्या मूळ किमतीला अर्थात बेस प्राईला (2 कोटी), पंजाबने खरेदी केलं.

गेलने त्याची निवड निदान पहिल्या सामन्यात तरी सार्थ ठरवली आहे.

गेलने कालच्या सामन्यात अवघ्या 22 चेंडूत अर्धशतक झळकावलं, तर त्यानं एकूण 33 चेंडूत सात चौकार आणि चार षटकारांसह 63 धावा फटकावल्या.

गेल आणि के एल राहुल या जोडीने अवघ्या 8 षटकात 96 धावांची सलामी दिली.

सेहवागचा निर्णय गेलने सार्थ ठरवला!

या वर्षीच्या सुरुवातीला झालेल्या आयपीएलच्या लिलावात एक आश्चर्यकारक क्षण आला होता, जेव्हा एकाही फ्रंचायझीने वेस्ट इंडिजचा स्फोटक फलंदाज ख्रिस गेलवर बोली लावली नव्हती. मात्र पहिल्या दिवसाच्या लिलावात अनसोल्ड राहिलेल्या ख्रिस गेलवर दुसऱ्या दिवशी बोली लावण्यात आली. किंग्स इलेव्हन पंजाबने त्याला बेस प्राईस 2 कोटींमध्ये खरेदी केलं.

गेलला खरेदी करताच सर्व फ्रँचायझींनी पंजाबचं टाळ्या वाजवून अभिनंदन केलं. मात्र त्याचं संघात असणंच पुरेसं आहे, अशी प्रतिक्रिया पंजाबचा मेंटॉर आणि टीम इंडियाचा माजी सलामीवीर फलंदाज वीरेंद्र सेहवागने त्यावेळी दिली होती. सलामीवीर फलंदाज म्हणून तो कोणत्याही संघासाठी धोकादायक आहे, असं सेहवाग म्हणाला होता.

सेहवागचा हा निर्णय गेलने योग्य ठरवल्याचं कालच्या सामन्यात पाहायला मिळालं.

ख्रिस गेलच्या नावावर फर्स्ट क्लास  टी-20 क्रिकेटमध्ये 11 हजारपेक्षा जास्त धावा .

संबंधित बातम्या

... म्हणून अनसोल्ड राहिलेल्या गेलवर बोली लावली : सेहवाग