हैदराबाद : अखेरच्या षटकात विजयासाठी 15 धावांची आवश्यकता असताना युसूफ पठाण सनरायझर्स हैदराबादच्या मदतीला धावून गेला. त्याने चार चेंडूंत 13 धावा ठोकून हैदराबादला दिल्ली डेअरडेव्हिल्सवर सनसनाटी विजय मिळवून दिला. हैदराबादनं या सामन्यात दिल्लीचा सात विकेट्सनी धुव्वा उडवून, आयपीएलच्या गुणतालिकेत अव्वल स्थानावर झेप घेतली. हैदराबादचा हा नऊ सामन्यांमधला सातवा विजय ठरला. हैदराबादच्या खात्यात आता 14 गुण आहेत. दरम्यान, पृथ्वी शॉने 64 आणि कर्णधार श्रेयस अय्यरनं 44 धावांची खेळी करुन या सामन्यात दिल्लीला पाच बाद 163 धावांची मजल मारुन दिली होती. पण हैदराबादच्या पाचही फलंदाजांनी दिल्लीच्या आक्रमणावर हल्ला चढवून आपल्या संघाला विजय मिळवून दिला. युसूफ पठाणनं 12 चेंडूंत दोन चौकार आणि दोन षटकारांसह हैदराबादच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली.