मुंबई : आयपीएलच्या नव्या मोसमाचा बिगुल वाजला आहे. ट्वेन्टी ट्वेन्टीच्या या महायुद्धाला तोंड फुटण्यासाठी आता काही तासांचाच अवधी उरला आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर या महायुद्धाची ठिणगी पडली, की पुढचे पन्नास दिवस आठ फौजांमधल्या साठ लढायांचा रोमांच अनुभवण्याची संधी जगभरातल्या क्रिकेटरसिकांना मिळणार आहे. ट्वेन्टी20 च्या या महायुद्धाला एण्टरटेनमेन्टची आणि वादविवादांची फोडणी अधूनमधून मिळणार आहे.

एक चेंडू आणि चार धावा... हे होतं विजयासाठीचं समीकरण. डॅनियल ख्रिस्तियननं मिचेल जॉन्सनचा चेंडू डीप मिडविकेटला फटकावलाही. पण तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात रायझिंग पुण्याचा सुपरजायंट वॉशिंग्टन सुंदर धावचीत झाला आणि अवघ्या एकाच धावेच्या फरकानं आयपीएलच्या दहाव्या मोसमाच्या विजेतेपदाची ट्रॉफी रोहित शर्मा आणि त्याच्या मुंबई इंडियन्सच्या शिलेदारांच्या हातात आली.

मुंबई इंडियन्सच्या त्या सनसनाटी विजयाच्या आठवणी आज वर्षभरानंतरही ताज्या आहेत. पण एव्हाना आयपीएलच्या अकराव्या मोसमाचाही बिगुल वाजला.

गतविजेती मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स या फौजांमधल्या लढाईनं, मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर आयपीएलच्या आगामी महायुद्धाची ठिणगी पडेल.



आयपीएलच्या अकराव्या मोसमाचा फॉरमॅट जुनाच असला, तरी हा मोसम क्रिकेटरसिकांसाठी खूप काही नवं घेऊन आलाय. नवा मोसम आणि नवी संघबांधणी हे आहे यंदाच्या मोसमाचं पहिलं वैशिष्ट्य.

2013 सालच्या स्पॉट फिक्सिंग प्रकरणात दोन वर्षांच्या बंदीची शिक्षा भोगणाऱ्या चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्सचं पुनरागमन हे यंदाच्या आयपीएलचं दुसरं वैशिष्ट्य आहे.

आयपीएलच्या अकराव्या मोसमात मूळच्या आठही फ्रँचाईजी पुन्हा आमनेसामने उभ्या ठाकतील. आधीच्या संघातला एखाददुसरा, किंवा फार फार तर तिसराही शिलेदार कायम राखून या आठही फ्रँचाईझींनी लिलावातून नव्यानं संघबांधणी केली आहे.

आयपीएलच्या तोंडावरच राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबादला या दोन संघांना केपटाऊन कसोटीतल्या बॉल टॅम्परिंगचा फटका बसला. क्रिकेट ऑस्ट्रेलियानं स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नरवर घातलेल्या एका वर्षाच्या बंदीमुळे त्या दोघांनाही यंदाच्या आयपीएलमध्ये खेळण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबादला आपापल्या कर्णधाराला मुकावं लागलं आहे.

राजस्थान रॉयल्सनं स्टीव्ह स्मिथच्या अनुपस्थितीत कर्णधारपदाची धुरा अजिंक्य रहाणेच्या खांद्यावर सोपवली आहे. राजस्थान रॉयल्सनं दक्षिण आफ्रिकेचा तडाखेबंद फलंदाज हेन्रिच क्लासेनला आपल्या ताफ्यात सामावून घेऊन, स्मिथची उणीव भासू न देण्याचा आटोकाट प्रयत्न केला आहे. तिकडे डेव्हिड वॉर्नरऐवजी न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन हा सनरायझर्स हैदराबादच्या नेतृत्त्वाची जबाबदारी सांभाळेल. त्यामुळे केन विल्यमसन हा यंदाच्या आयपीएलमधला एकमेव परदेशी कर्णधार असेल. हैदराबादनं वॉर्नरऐवजी अॅलेक्स हेल्सची खरेदी करुन आपल्या संघात नवी जान ओतण्याचा प्रयत्न केला आहे.

गतविजेत्या मुंबई इंडियन्सनं रोहित शर्माला, चेन्नई सुपर किंग्सनं महेंद्रसिंग धोनीला, तर रॉयल चॅलेंजर्स बंगलोरनं विराट कोहलीला कर्णधारपदी कायम राखून त्यांच्यावरचा आपला विश्वास पुन्हा दाखवून दिला. कोलकाता नाईट रायडर्सला कर्णधार म्हणून दोनदा आयपीएल जिंकून देऊनही, शाहरुख खानच्या फ्रँचाईझीनं गौतम गंभीरवर तो विश्वास दाखवला नाही. त्यांनी गंभीरला आपल्या बंधनातून मोकळं केलं. दिल्ली डेअरडेव्हिल्सनं गंभीरवर यशस्वी बोली लावलीच, दिल्ली डेअरडेव्हिसच्या कर्णधारपदाचा भारही त्याच्या खांद्यावर सोपवला.

रवीचंद्रन अश्विनला वन डे आणि ट्वेन्टी ट्वेन्टीत सध्या बॅडपॅच आहे. याच काळात चेन्नई सुपर किंग्सनं त्याच्याकडे पाठ फिरवून हरभजनसिंगला खरेदी केलं. पण अश्विनचं नशीब थोर. प्रिटी झिंटाच्या किंग्स इलेव्हन पंजाबनं त्याच्यावर यशस्वी बोली लावली आणि मग कर्णधारपदाची सूत्रं त्याच्या हाती सोपवली.

धोनीच्या सावलीत गेल्या चौदा वर्षांत वाढू न शकलेल्या दिनेश कार्तिकला अचानक सुगीचे दिवस आले आहेत. आयपीएलच्या पहिल्या दहा मोसमांत दर दर की ठोकरे खाणारा हा यष्टिरक्षक-फलंदाज यंदाच्या मोसमात चक्क कोलकाता नाईट रायडर्सचा कप्तान झाला आहे. शाहरुख खाननं दाखवलेल्या त्या विश्वासानं कार्तिकचा आत्मविश्वास इतका उंचावला की, त्यानं अखेरच्या चेंडूवर विजयी षटकार ठोकून टीम इंडियाला ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांच्या तिरंगी मालिकेचं विजेतेपद जिंकून दिलं. तोच दिनेश कार्तिक आता कोलकात्याचा कर्णधार म्हणून आयपीएलच्या महायुद्धासाठी सज्ज झाला आहे.

आयपीएलच्या या महायुद्धातली प्रत्येक लढाई ही हातघाईची आहे. ती एकेक लढाई जिंकून प्राथमिक साखळीत चौदा लढायांचं आव्हान पेलायचं आहे. त्या चौदा लढायांनतर प्ले ऑफ आणि प्ले ऑफमधून तावून सुलाखून निघालं की, आखरी जंग असं आयपीएलच्या महायुद्धाचं भरभक्कम आव्हान आठ फौजांच्या समोर आहे. आयपीएलच्या या महायुद्धाचा कालावधी पन्नास दिवसांचा आहे. त्यामुळे प्रत्येक लढाई ही ट्वेन्टी ट्वेन्टीची असली तरी लक्ष्य हे आयपीएलचं महायुद्ध जिंकण्याचं हवं.