पंढरपूर : सोलापुरातील दोन शेतकऱ्यांवर पडलेला आमदार पुत्रांच्या कर्जाचा साडे तेरा कोटी रुपयांचा बोजा 'एबीपी माझा'च्या दणक्यानंतर निघाला. शरद घोलप आणि आनंद मासाळ या शेतकऱ्यांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बबन शिंदे यांच्या मुलांच्या गहाण खताचा बोजा टाकण्यात आला होता.
सोलापुरातील माढ्यामधले आमदार बबन शिंदे यांच्या पुत्रांच्या गहाण खताचा साडेतेरा कोटी रुपयांचा बोजा अधिकाऱ्यांनी दुसऱ्याच दोन शेतकऱ्यांच्या उताऱ्यावर चढवण्याचा प्रताप केला होता. त्यामुळे ही दोन्ही शेतकरी कुटुंबं उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर होती.
बबनराव शिंदे यांच्या दोन मुलांनी साडे तेरा कोटी रुपयाचं वैयक्तिक कर्ज घेतलं. कर्जापोटी आपल्या 6 मालमत्तांचं गहाणखत माढ्याच्या दुय्यम निबंधक कार्यालयात 17 नोव्हेंबर 2017 रोजी केलं. मात्र प्रशासनाने आमदार पुत्रांच्या सातबारा उताऱ्यावर बोजा चढण्याच्या ऐवजी माढ्यातील दोन सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या उताऱ्यावर हा साडे तेरा कोटी रुपयाचा बोजा चढवला.
याबाबत आमदार शिंदे आणि त्यांच्या कुटुंबाला कोणतीच माहिती नसल्याचंही समोर आलं. मात्र आपल्याकडून झालेली चूक मान्य करुन या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याऐवजी दुय्यम निबंधक कार्यालय आणि प्रशासन या शेतकऱ्यांना उडवाउडवीची उत्तरं देऊ लागली होती. सर्वच ठिकाणाहून निराश झालेल्या शरद घोलप आणि आनंद मासाळ या दोन शेतकऱ्यांनी अखेर 'एबीपी माझा'शी संपर्क साधला होता.
आमदार पुत्रांचं साडे तेरा कोटींचं कर्ज शेतकऱ्यांच्या नावावर
या प्रकरणाची तपासणी करताना यात दुय्यम निबंधक कार्यालय आणि तहसील विभागाकडून अक्षम्य चूक झाल्याचं निदर्शनाला येताच 'माझा'ने या दोन शेतकऱ्यांची वेदना समोर आणली. ज्यांच्या शेतात पोटापुरतं पिकतं अशा शेतकऱ्यांच्या उताऱ्यावर साडेतेरा कोटी रुपयांचा बोजा आल्याने ही दोन्ही कुटुंबं पुरती हादरुन गेली होती.
याचा जाब अधिकाऱ्यांना विचारल्यावर त्यांनी चूक कबूल केली. 'माझा'च्या बातमीनंतर वरिष्ठ पातळीवरुन या प्रकरणाच्या चौकशीला सुरुवात झाल्यानंतर तातडीने माढ्याचे तहसीलदार सदाशिव पडदुणे आणि प्रांताधिकाऱ्यांनी दुय्यम निबंधक कार्यालयाची झालेली चूक दुरुस्त करत या दोन्ही शेतकऱ्यांच्या उताऱ्यावर चढलेला साडेतेरा कोटींचा बोजा हटवला आणि त्यांचा उतारा कोरा झाला.
तहसील कार्यालयाकडून कागदपत्रे हातात पडताच दोन्ही कुटुंबं सुखावली. आपल्या डोक्यावरचे आणि उताऱ्यावरचे दोन्ही ओझी 'एबीपी माझा'मुळे उतरवल्याबद्दल त्यांनी आभार मानले.
शेतकऱ्यांवरील आमदारपुत्रांचा साडेतेरा कोटींचा बोजा हटवला
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
07 Apr 2018 08:35 AM (IST)
शरद घोलप आणि आनंद मासाळ या शेतकऱ्यांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बबन शिंदे यांच्या मुलांच्या गहाण खताचा बोजा टाकण्यात आला होता.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -