या सामन्यात बंगलोरनं मुंबईसमोर विजयासाठी 168 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पण टीम साऊथी, उमेश यादव आणि मोहम्मद सिराजच्या माऱ्यासमोर मुंबईला 7 बाद 153 धावांचीच मजल मारता आली.
हार्दिक पंड्या वळगता मुंबईच्या एकाही फलंदाजाला लौकिकाला साजेशी खेळी करता आली नाही. पंड्यानं 42 चेंडूंत 50 धावांची खेळी उभारली.
बंगलोरकडून साऊथी, सिराज आणि उमेश यादवनं प्रत्येकी दोन फलंदाजांना माघारी धाडलं.
शेवटची ओव्हर महागात
या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या बंगलोरचा डाव 150 च्या आत आटपेल असं वाटत होतं. मात्र मिचेल मॅक्लेघनने टाकलेली शेवटची ओव्हर मुंबईला महागात पडली. मॅक्लेघनने शेवटच्या ओव्हरचा शेवटचा चेंडू नो बॉल टाकला, त्यामुळे त्या दोन चेंडूवर बंगलोरला 13 धावा मिळाल्या. त्याचाच परिणाम म्हणजे मुंबई 14 धावांनी हरली. याच 13 धावाच मुंबईला महागात पडल्या.
बंगलोरच्या ग्रँडहोमने मॅग्लेघनच्या शेवटच्या षटकात 3 षटकारांसह 24 धावा कुटल्या. त्यामुळेच मुंबईला बंगलोरच्या 167 धावांपर्यंत मजल मारता आली नाही.
कोहलीचं बायकोला बर्थ डे गिफ्ट
दरम्यान, बंगलोरचा कर्णधार विराट कोहलीची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा कालच्या सामन्याला उपस्थित होती. काल अनुष्काचा वाढदिवस होता. विराटने अनुष्काला मॅच विजयाचं गिफ्ट दिलं.
विराट म्हणाला, "माझी बायको आज इथे उपस्थित आहे. आज (मंगळवार) तिचा वाढदिवस आहे. आमचा विजय तिने पाहिला, याचा मला आनंद आहे. तिच्यासमोर आम्हाला दोन गुण मिळाले, याचाही आनंद आहे"