मुंबई: राजस्थान रॉयल्सनं वानखेडेवरच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा सात विकेट्सनी धुव्वा उडवून, आयपीएलमधलं आपलं आव्हान कायम राखलं. पण राजस्थानकडून झालेल्या पराभवानं मुंबई इंडियन्सच्या आव्हानाला धोका निर्माण झाला आहे.


जॉस बटलर राजस्थानच्या या विजयाचा प्रमुख शिल्पकार ठरला. त्यानं 53 चेंडूंत नऊ चौकार आणि पाच षटकारांसह नाबाद 94 धावांची खेळी उभारली. बटलरचं यंदाच्या मोसमातलं हे पाचवं अर्धशतक ठरलं.

या सामन्यात मुंबईनं राजस्थानला विजयासाठी अवघं 169 धावांचं आव्हान दिलं होतं. बटलरनं अजिंक्य रहाणेच्या साथीनं 95 आणि संजू सॅमसनच्या साथीनं 61 धावांची भागीदारी रचून, राजस्थानला विजयाच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवलं.

मग त्यानंच हार्दिक पंड्याला षटकार ठोकून राजस्थानच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

त्याआधी मुंबईचे सलामीवीर सूर्यकुमार यादव 38 आणि एविन लुईसच्या 60 धावांमुळे मुंबईला दमदार सुरुवात मिळाली. लुईसने 42 चेंडूत 4 चौकार आणि 4 षटकार ठोकत 60 धावा केल्या.

मात्र त्यांच्यानंतर कोणालाही मोठी खेळी करता आली नाही. कर्णधार रोहित शर्मा शून्यावर बाद झाला. ईशान किशन 12, हार्दिक पंड्या 21 चेंडूत 36, कृणाल पंड्या 3 धावा करुन माघारी परतले.

तर कटिंग 10 आणि ड्युमिनी शून्यावर नाबाद राहिले.