सनरायझर्स हैदराबादचा सनसनाटी विजय, पंजाबचा दारुण पराभव
एबीपी माझा वेब टीम | 27 Apr 2018 08:16 AM (IST)
सनरायझर्स हैदराबादनं किंग्स इलेव्हन पंजाबचा अख्खा डाव अवघ्या ११९ धावांत गुंडाळून, आयपीएलच्या रणांगणात १३ धावांनी सनसनाटी विजय मिळवला.
हैदराबाद : सनरायझर्स हैदराबादनं किंग्स इलेव्हन पंजाबचा अख्खा डाव अवघ्या ११९ धावांत गुंडाळून, आयपीएलच्या रणांगणात १३ धावांनी सनसनाटी विजय मिळवला. या सामन्यात पंजाबनं आधी हैदराबादला सहा बाद १३२ धावांत रोखलं होतं. त्यामुळं पंजाबसमोर विजयासाठी १३३ धावांचंच माफक आव्हान होतं. पण लोकेश राहुल आणि ख्रिस गेलच्या पंजाबला ते आव्हान पेलवलं नाही. राहुल आणि गेलनं पंजाबला ५५ धावांची सलामी दिली, पण हैदराबादच्या प्रभावी आक्रमणासमोर पंजाबचा डाव एक बाद ५५ धावांवरून सर्व बाद ११९ असा कोसळला. हैदराबादचा यंदाच्या मोसमातला हा लागोपाठ दुसरा सनसनाटी विजय ठरला. हैदराबादनं याआधी मुंबईला ११९ धावांचं आव्हान देऊन, केवळ ८७ धावांत गुंडाळलं होतं. त्यानंतर पुन्हा तशीच कामगिरी त्यांनी करुन दाखवली आहे.