नवी दिल्ली : यंदाच्या आयपीएल मोसमासाठीचा लिलाव संपला आहे. आयपीएल फ्रँचायझींनी खेळाडूंवर पैशांचा पाऊस पाडला. तर काही खेळाडू अनसोल्ड राहिले. मात्र आयपीएलच्या काही संघांसमोर सध्या एक मोठा पेचप्रसंग आहे. किंग्ज इलेव्हन पंजाब आणि कोलकाता नाईट रायडर्ससमोर कर्णधार निवडण्याचं मोठं आव्हान आहे.


कोलकाता आणि पंजाबने दिग्गज खेळाडूंची खरेदी केली. मात्र दोन्ही संघांकडे असा एकही चेहरा नाही, ज्याच्याकडे कर्णधारपदाची धुरा दिली जाऊ शकते. पंजाबने आता आपल्या अधिकृत वेबसाईटवर कर्णधार म्हणून कुणाला पाहायला आवडेल, असा प्रश्न चाहत्यांना विचारला आहे.

पंजाबच्या संघात सध्या असे काही चेहरे आहेत, ज्यांच्याकडे कर्णधार म्हणून पाहिलं जात. या यादीत सर्वात पहिलं नाव चेन्नई सुपर किंग्जचा माजी खेळाडू रविचंद्रन अश्विनचं आहे. अश्विन पंजाबच्या कर्णधारपदाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे.

याशिवाय युवराज सिंह, ख्रिस गेल, अॅरॉन फिंच आणि अक्षर पटेल यांच्या नावांचीही चर्चा आहे. संघाची धुरा कुणाकडे द्यायची याचा अंतिम निर्णय संघ व्यवस्थापन आणि मेंटॉर वीरेंद्र सेहवागला घ्यायचा आहे.