हैदराबाद: आयपीएलच्या दहाव्या मोसमाच्या अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सनं अगदी शेवटच्या क्षणी पुण्याचा विजयाचा घास हिसकावून घेतला. रायझिंग पुणे सुपरजायंट्सवर अवघ्या एका धावेने विजय मिळवत मुंबईने तिसऱ्यांदा आयपीएल विजेतेपद पटकावलं.

हैदराबादच्या राजीव गांधी मैदानात शेवटच्या चेंडूपर्यंत सामना रंगला होता. अवघ्या एका धावेनं विजय मिळवत मुंबईनं पुणेवर मात केली.

मुंबईनं प्रथम फलंदाजी करताना पुण्यासमोर अवघ्या 130 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पण पुण्याला फक्त 128 धावांपर्यंतच मजल मारता आली. अजिंक्य रहाणे आणि कर्णधार स्मिथ यांचा अपवाद वगळता पुण्याचे इतर फलंदाज फारशी चमक दाखवू शकले नाही.

हा सामना प्रचंड उत्कंटावर्धक झाला होता. अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत सामना कोण जिंकणार हे समजणं कठीण होतं. शेवटच्या दोन षटकामध्ये पुण्याला जिंकण्यासाठी 23 धावांची गरज होती. कर्णधार स्मिथनं बुमराहला लाँग ऑफला षटकार ठोकून 19व्या ओव्हरमध्ये 12 धावा केल्या. त्यामुळे शेवटच्या ओव्हरमध्ये पुण्याला विजयासाठी फक्त 11 धावांची गरज होती.

शेवटच्या षटकातील थरार...

कर्णधार रोहीत शर्मानं चेंडू अनुभवी मिचेल जॉन्सनकडे सोपवला. पण त्याचा पहिल्याच चेंडूवर मनोज तिवारीनं शानदार फटका मारुन चौकार लगावला. त्यामुळे पुण्याला पाच चेंडूत फक्त 7 धावा हव्या होत्या. पण दुसऱ्याच चेंडूवर पुन्हा एक जोरदार फटका मारण्याचा नादात मनोज तिवारी बाद झाला. त्यामुळे सामन्याची पूर्ण जबाबदारी कर्णधार स्मिथवर आली. आता पुण्याला 4 चेंडूत 7 धावांची गरज होती.

जॉन्सननं या चेंडूला थोडीशी गती दिली. स्मिथनं यावर जोरदार प्रहार केला देखील पण एक्स्ट्रा कव्हरवर उभ्या असलेल्या अंबाती रायडूनं अचूक कॅच घेतला अन् इथेच सामना फिरला. लागोपाठ दोन चेंडूवर दोन गडी बाद झाल्यानं पुण्याची अवस्था बिकट झाली. त्यामुळे आता पुण्याला 3 चेंडूत 7 धावा हव्या होत्या.

मैदानात वॉश्गिंटन सुंदर आणि डेनियल क्रिस्टियन हे दोघेही नवखे खेळाडू होते. जॉन्सननं वॉश्गिंटन सुंदरला अप्रतिम चेंडू टाकला. पण पार्थिवकडे गेलेल्या चेंडूवर 1 धाव घेत क्रिस्टियन स्ट्राईकवर आला. त्यामुळे आता पुण्याला 2 चेंडूत 6 धावा हव्या होत्या.

क्रिस्टियननं पाचव्या चेंडूवर चौकार किंवा षटकार मारण्याचा प्रयत्न केलाही पण. त्याला फक्त 2 धावा मिळाल्या. त्यानंतर पुण्याला 1 चेंडूत 4 धावा हव्या होत्या. तेव्हा क्रिस्टियननं जोरदार फटका मारला. पण लाँग ऑनवर असलेल्या खेळाडू चेंडू अडवत थेट पार्थिवकडे फेकला. चौकार जरी गेला नसला तरी 3 धावा घेऊन सामना टाय करण्याचा क्रिस्टियन आणि वॉश्गिंटननं जोरदार प्रयत्न केला. पण पार्थिवनं आपली भूमिका चोखपणे बजावत वॉश्गिंटनला रनआऊट केलं आणि मुंबईनं अवघ्या एका धावेनं सामना जिंकला.

संबंधित बातम्या:

#IPL final मध्ये मुंबईची बाजी, पुण्यावर एका धावेने विजय