मुंबई : डेव्हिड वॉर्नरच्या सनरायझर्स हैदराबादनं आयपीएलच्या नवव्या मोसमात विजेतेपदाच्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. हैदराबादनं अंतिम सामन्यात विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगलोरला 8 धावांनी हरवून पहिल्यांदाच आयपीएलचं विजेतेपद मिळवलं.


 

बंगळुरूत झालेल्या सामन्यात हैदराबादनं बंगलोरला विजयासाठी 209 धावांचं भलं मोठं आव्हान दिलं होतं. पण बंगलोरला 20 षटकांत सात बाद 200 धावाच करता आल्या.

 

खरं तर ख्रिस गेलनं 76 धावांची आणि विराट कोहलीनं 54 धावांची खेळी करून बंगलोरच्या डावाची भक्कम पायाभरणी केली होती. त्यामुळं सामना हैदराबादच्या हातून निसटताना दिसत होता. पण बेन कटिंगनं गेलला बाद केलं आणि हैदराबादला ब्रेक थ्रू मिळवून दिला.

 

कटिंगनं चार षटकांत 35 धावांच्या मोबदल्यात दोन विकेट्स काढल्या आणि बंगलोरच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. मुस्तफिजूर रहमान, बरिंदर सरन आणि बिपुल शर्मानंही प्रत्येकी एक विकेट काढून हैदराबादच्या विजयाला हातभार लावला.

 

त्याआधी डेव्हिड वॉर्नरच्या 69, युवराजच्या 38 आणि बेन कटिंगच्या नाबाद 39 धावांच्या खेळींच्या जोरावर हैदराबादनं 20 षटकांत सात बाद 208 धावा केल्या होत्या.