हैदराबादची मदार वॉर्नरवर
डेव्हिड वॉर्नरचा गतविजेता सनरायझर्स हैदराबाद यंदाच्या मोसमातही आयपीएलच्या विजेतेपदावर आपलं नाव कोरण्याच्या इराद्यानं सलामीच्या सामन्यासाठी मैदानात उतरेल. हैदराबादच्या फलंदाजीची धुरा ही प्रामुख्यानं कर्णधार डेव्हिड वॉर्नरच्या खांद्यावर राहिल.
गेल्या मोसमात वॉर्नरनेच हैदराबादच्या फलंदाजीचा भार वाहिला होता. वॉर्नरच्या साथीनं सलामीला उतरणारा शिखर धवन, धडाकेबाज युवराज सिंग आणि केन विल्यमसन हे तिघंही हैदराबादच्या फलंदाजीचे मुख्य आधारस्तंभ असतील.
बांगलादेशचा मुस्ताफिजूर रेहमान खांद्याच्या दुखापतीमुळे सलामीच्या सामन्यात खेळणार नाही. त्याच्या अनुपस्थितीत आशीष नेहरा, भुवनेश्वर कुमार आणि बरिंदर सरन हे त्रिकूट हैदराबादच्या वेगवान आक्रमणाची सूत्रं सांभाळतील.
बंगळुरुला दुखापतींचं ग्रहण
बंगळुरुचा कर्णधार विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्स या सामन्यात खेळू शकणार नाहीत. विराटला उजव्या खांद्याच्या दुखापतीमुळे किमान एक आठवडा सक्तीची विश्रांती घ्यावी लागली आहे. डिव्हिलियर्सही सध्या पाठीच्या दुखापतीमुळे विश्रांती घेत आहे.
बंगळुरुच्या लोकेश राहुल आणि सरफराझ खान यांना तर दुखापतीमुळे यंदाच्या आयपीएल मोसमातूनच माघार घ्यावी लागली आहे. या परिस्थितीत बंगळुरुच्या फलंदाजीची जबाबदारी ख्रिस गेल, केदार जाधव आणि शेन वॉटसनच्या खांद्यावर राहिल. विराटच्या अनुपस्थितीत वॉटसनच बंगळुरुच्या नेतृत्त्वाची धुरा सांभाळणार आहे.
पाच सामन्यांपूर्वी कलाविष्कार
आयपीएलच्या दहाव्या मोसमाचं एक आगळं वैशिष्ट्य म्हणजे यंदा स्पर्धेचा उद्घाटन सोहळा हा केवळ सलामीच्या सामन्याच्या एकाच स्टेडियममध्ये नाही तर, पाच सामन्यांच्या वेगवेगळ्या स्टेडियम्समध्ये आयोजित करण्यात आला आहे.
हैदराबाद-बंगळुरु संघांमधल्या सामन्याच्या वेळी अभिनेत्री एमी जॅक्सनची अदाकारी हा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरेल. पुणे-मुंबई संघांमधल्या सहा एप्रिलच्या सामन्यानिमित्तानं गहुंजे स्टेडियमवर रितेश देशमुखचा परफॉर्मन्स असेल. सात एप्रिलला गुजरात-कोलकाता सामन्याच्या निमित्तानं टायगर श्रॉफ राजकोटच्या स्टेडियमवर परफॉर्म करेल.
कोलकाता-पंजाब सामन्याच्या निमित्तानं 13 एप्रिलला ईडन गार्डन्सवर श्रद्धा कपूर आणि मोनाली ठाकूर या दोघींचा परफॉर्मन्स असेल. त्यानंतर 15 एप्रिलला दिल्ली-पंजाब सामन्याच्या निमित्तानं दिल्लीच्या कोटला स्टेडियमवर परिणीती चोप्राचा परफॉर्मन्स पाहायला मिळणार आहे.
बंगळुरु आणि इंदूरला आठ एप्रिल रोजी, तर मुंबईत नऊ एप्रिल रोजी होत असलेल्या सामन्यांआधीही एखाद्या लोकप्रिय कलाकाराचा परफॉर्मन्स पाहण्याची संधी मिळणार आहे.
आयपीएलचा हा रथ देशातल्या दहा शहरांमधून तब्बल 47 दिवसांचा प्रवास करुन निर्णायक लढाईसाठी 21 मे रोजी पुन्हा हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवरच दाखल होईल. 47 दिवसांच्या या कालावधीत आयपीएलच्या रणांगणातल्या आठ फौजांमध्ये 56 साखळी, तीन प्ले ऑफ आणि एक फायनल अशा मिळून 60 लढती पाहायला मिळतील.
प्रत्येक संघ 14 सामने खेळणार आहे. यापैकी सात सामने संघाच्या होम ग्राऊंडवर होतील. 2011 नंतर पहिल्यांदाच इंदूरमध्ये आयपीएल सामने होणार आहेत.
साठ लढायांचं हे महायुद्ध जिंकणारी फौज कोणती, या प्रश्नाचं उत्तर आपल्याला 21 मे रोजी हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर मिळणार आहे.