हैदराबाद : गोलंदाज जयदेव उनाडकटने अखेरच्या षटकात घेतलेल्या हॅट्ट्रीकच्या जोरावर रायझिंग पुणे सुपरजायंटने प्ले ऑफमध्ये स्थान मिळवलं आहे. पुण्याने या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा 12 धावांनी पराभव केला.

हैदराबादला अखेरच्या षटकात 13 धावांची गरज होती. मात्र जयदेवने या षटकाच्या दुसऱ्याच चेंडूवर बिपूल शर्मा, दुसऱ्या चेंडूवर रशीद खान आणि तिसऱ्या चेंडूवर भुवनेश्वर कुमारला माघारी धाडत हॅट्ट्रीक साजरी केली. त्याने या सामन्यात एकूण 5 विकेट्स घेतल्या.

पुण्याने हैदराबादला विजयासाठी 149 धावांचं आव्हान दिलं होतं. हैदराबादला चांगली सुरुवात मिळूनही मधल्या फळीतील फलंदाजांनी निराशा केली. त्यामुळे हैदराबादला पराभवाचा सामना करावा लागला. हैदराबादचा संपूर्ण डाव केवळ 136 धावांमध्येच गुंडाळला.

पुण्याने गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. तर हैदराबाद चौथ्या स्थानावर आहे. पुणे आणि हैदराबाद यांचे प्रत्येकी दोन सामने उरले आहेत. हैदराबादला प्ले ऑफच्या शर्यतीत आव्हान कायम राखण्यासाठी उर्वरित दोन्हीही सामन्यांमध्ये विजय मिळवणं आवश्यक आहे.

पुण्याकडून अजिंक्य रहाणे 22, कर्णधार स्टीव्ह स्मिथ 34, बेन स्टोक्स 39 आणि महेंद्रसिंह धोनीने 31 धावांचं योगदान दिलं.

सनरायझर्सनेही सुरुवातीला चांगली फलंदाजी केली. कर्णधार डेव्हिड वॉर्नरने 40 आणि युवराज सिंहने शानदार 47 धावांची खेळी केली.

पुण्याच्या नावावर सध्या 12 सामन्यांपैकी 8 विजय आणि 4 पराभव आहेत. 16 गुणांसह मुंबई इंडियन्स पाठोपाठ पुणे दुसऱ्या स्थानावर आहे. मुंबईच्या नावावरही सध्या 10 सामन्यात 16 गुण आहेत.