पुणे:  आयपीएलमध्ये आज मुंबई इंडियन्स आणि रायझिंग पुणे सुपरजाएंट्स या संघात लढाई रंगणार आहे. पुण्यातील गहुंजे मैदानात हा सामना होईल.


मात्र या सामन्यादरम्यान हायवेवरील बारना बंदी असूनही व्हीव्हीआयपी प्रेक्षक/सेलिब्रिटींना दारु मिळणार आहे.

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे गहुंजे स्टेडियम हे पुणे- मुंबई द्रुतगती महामार्गाला अगदी लागून आहे. मैदानाचं हायवेपासूनचं अंतर पाचशे मीटरपेक्षाही कमी आहे.

मात्र तरीही या मैदानात आज पुणे आणि मुंबईदरम्यान होणार्‍या सामन्यावेळी व्हीआयपी लाउंजमध्ये दारु देण्यासाठी, एक्साईज डीपार्टमेंटने परवानगी दिली आहे. त्यासाठी दिलेलं कारण गमतीशीर आहे.

या मैदानात आयपीएलचा सामना पाहण्यासाठी येणारे व्हीआयपी, हे मैदानाच्यासमोर त्यांची वाहने पार्क करतात आणि मुख्य प्रवेशद्वारातून आत जातात. मात्र सामान्यांना मैदानापासून दूर उजव्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत त्यांची वाहने लावावी लागतात आणि तिथून चालत मैदानापर्यंत पोहचाव लागतं.

सामान्यांना चालत येण्याचं हे अंतर दीड किलोमीटरच आहे आणि नियमानुसार सामान्यांना जे अंतर कापावे लागते ते ग्राह्य धरले जाते असा एक्साईज डीपार्टमेंटचे अधिकारी दावा करतात. परंतु मॅचच्या दरम्यान दारु मात्र सामान्यांना मिळत नाही. फक्त व्हीआयपी लाउंजमध्ये मिळते.

उत्पादन शुल्क विभागाचं स्पष्टीकरण

गहुंजे स्टेडियमसाठी कोणतेही नियम शिथील केलेले नाहीत. प्रेक्षक मुख्य रस्त्यापासून चालत जातात ते अंतर मोजण्यात आलं आहे. हे अंतर 500 मीटरपेक्षा जास्त आहे. हे तपासून मगच आजच्या सामन्यासाठी अल्कोहोल सर्व्ह करण्याचं एक दिवसाचा परवाना दिला आहे, असं राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक मोहन वर्दे यांनी सांगितलं.