दिल्ली : मुंबई इंडियन्सने दिल्लीचा अवघ्या 66 धावांत खुर्दा उडवून कोटला स्टेडियमवरच्या सामन्यात 146 धावांनी दणदणीत विजय साजरा केला. मुंबईचा हा अकरा सामन्यांमधला नववा विजय ठरला.


मुंबईने नऊ विजयांसह 18 गुणांची कमाई केली असून आयपीएलच्या गुणतालिकेत मुंबईने आपलं अव्वल स्थान आणखी भक्कम केलं. दिल्लीचा हा अकरा सामन्यांमधला सातवा पराभव ठरला.

दिल्लीच्या खात्यात चार विजयांसह आठच गुण असून दिल्लीचं आव्हान जवळजवळ संपुष्टात आल्यात जमा आहे. या सामन्यात मुंबईने दिल्ल्लीला विजयासाठी 213 धावांचं तगडं आव्हान दिलं होतं. पण कोटलाच्या ज्या खेळपट्टीवर मुंबईच्या फलंदाजांनी धावांचा डोंगर उभारला, त्याच खेळपट्टीवर दिल्लीचा अख्खा डाव 66 धावांत आटोपला.

मुंबईच्या हरभजन सिंह आणि कर्ण शर्माने प्रत्येकी तीन, तर लसिथ मलिंगाने दोन फलंदाजांना माघारी धाडलं. त्याआधी, लेण्डल सिमन्स आणि कायरन पोलार्ड या वेस्ट इंडियन फलंदाजांच्या स्फोटक खेळींच्या जोरावर मुंबई इंडियन्सने 20 षटकांत तीन बाद 212 धावांची मजल मारली.

पोलार्डने 35 चेंडूंमध्ये पाच चौकार आणि चार षटकारांसह नाबाद 63 धावांची खेळी उभारली. सलामीच्या सिमन्सने 43 चेंडूंमध्ये पाच चौकार आणि चार षटकारांसह 66 धावांची खेळी केली. हार्दिक पंड्याने नाबाद 29 आणि पार्थिव पटेलनं 25 धावा फटकावून त्यांना छान साथ दिली.