मोहाली : सुरेश रैनाच्या गुजरातने मोहालीतल्या सामन्यात पंजाबचा सहा विकेट्सनी धुव्वा उडवून आयपीएलमधला चौथा विजय साजरा केला. गुजरातचं आयपीएलमधलं आव्हान आधीच संपुष्टात आलं आहे. त्यामुळे पंजाबवरचा विजय गुजरातसाठी निव्वळ औपचारिक ठरला.


या सामन्यातील पराभवाने पंजाबचं प्ले ऑफमध्ये खेळण्याचं स्वप्नही किंचित धूसर केलं. या सामन्यात हाशिम अमलाच्या शतकाच्या जोरावर पंजाबने गुजरातला विजयासाठी 190 धावांचं आव्हान दिलं होतं.

गुजरातने दोन चेंडू आणि सहा विकेट्स राखून त्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग केला. गुजरातकडून ड्वेन स्मिथने 74, ईशान किशनने 29, सुरेश रैनाने 39 तर दिनेश कार्तिकने नाबाद 35 धावांची खेळी करून विजयात मोलाचा वाटा उचलला.

त्याआधी हाशिम अमलाने आयपीएलच्या दहाव्या मोसमात दुसरं शतक ठोकण्याचा पराक्रम गाजवला. अमलाने आधी मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात नाबाद 104 धावांची खेळी केली होती.

अमलाने गुजरातविरुद्ध यंदाच्या मोसमातलं दुसरं शतक झळकावलं. त्याने 60 चेंडूंमध्ये आठ चौकार आणि पाच षटकारांसह 104 धावांची खेळी केली. अमलाच्या या शानदार शतकाच्या जोरावर पंजाबने 20 षटकांत तीन बाद 189 धावांची मजल मारली होती.

अमलाने शॉन मार्शच्या साथीने दुसऱ्या विकेटसाठी 127 धावांची भागीदारी रचली. शॉन मार्शने 43 चेंडूंमध्ये सहा चौकारांसह 58 धावांची खेळी उभारली.