भिवंडी: आंतरराष्ट्रीय पातळीवर लंगडी खेळात प्राविण्य मिळवणाऱ्या भिवंडी तालुक्यातील अनगाव येथील रेहान अकील शेख (वय १७ वर्ष) याचा आज (बुधवार) अपघाती मृत्यू झाला.
राहत्या घराच्या गच्चीवर लंगडीचा सराव करताना रेहानचा अचानक तोल गेला आणि तो खाली पडला. यावेळी त्याच्या डोक्याला जबर मार लागला. त्यातच त्याची प्राणज्योत मालवली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
भिवंडी तालुक्यातील अनगांव येथे कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता १२वी मध्ये शिकणारा रेहान हा चौथीपासून लंगडी खेळात चमकत आहे. त्याने अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर ठाणे जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले होते. मध्यप्रदेश येथे राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदकाचीही कमाई केली होती. तर जानेवारी २०१७ मध्ये महाविद्यालयीन स्तरावर नेपाळ येथे झालेल्या दक्षिण एशियन लंगडी स्पर्धेत भारतीय युवा संघाचे नेतृत्व करीत सुवर्णपदक पटकावले होते. तर आता त्याची सिंगापूर येथे होणाऱ्या आशियाई लंगडी स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली होती.
रेहान या स्पर्धेसाठी घराच्या टेरेसवर सराव करीत असताना त्याचा अचानक पाय घसरून तो खाली पडला. यावेळी त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र उपचार सुरु असताना त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. रेहान शेखच्या या आकस्मिक निधनाने भारतीय लंगडी संघाचे अतोनात नुकसान झाल्याची भावना त्याचे प्रशिक्षक सागर भोईर यांनी यावेळी व्यक्त केली.